Ind Vs Aus कोहली, बुमराह, राहुल यांचे पुनरागमन

सामना ऑनलाईन, मुंबई

इंग्लंडमध्ये येत्या 30 मेपासून खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीची अखेरची घटक चाचणी मानली जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील झटपट क्रिकेट मालिकांसाठी टीम इंडियाची निवड आज बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने घोषित केली. पाहुणा कांगारू संघ यजमान हिंदुस्थानी संघाविरुद्ध 2 T20 आणि 5 ODI लढतींची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठीच्या संघात कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर के. एल. राहुल यांनी पुनरागमन साजरे केले आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला मात्र या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे विश्वचषकाचे तिकीट मिळविण्याची त्याची अखेरची आशाही संपुष्टात आली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांचीही संघात निवड झाली आहे. मयांक मार्कंडेय या युवा खेळाडूला T20 मालिकेत संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी अष्टपैलू रवींद्र जाडेजा, खलील अहमद, सिराज यांना डच्चू देण्यात आला आहे. उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांना मात्र संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून दिनेश कार्तिकला वगळण्यात आले आहे. विजय शंकर आणि रिषभ पंतला T20 आणि एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली आहे. दोन T20 आणि पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.

हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून दोन T20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी ही हिंदुस्थानची अखेरची स्पर्धा आहे.

दोन टी-20 साठी हिंदुस्थानी संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा ,जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, विजय शंकर, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडेय.

पहिल्या दोन एकदिवसीय लढतींसाठी हिंदुस्थानी संघ- विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांडय़ा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, सिद्धार्थ कौल, के. एल. राहुल.

अखेरच्या तीन एकदिवसीय लढतींसाठी हिंदुस्थानी संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांडय़ा, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल.