सीकेपी खाद्यप्रकार विशेष आवडीचे!


ज्येष्ठ नाट्यकर्मी अजित भुरे यांना गोवा, कोकणातील ताजा मत्स्याहार विशेष भावतो.

  • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?– उदरभरण नोहेपेक्षाही अन्नाला चवीचं महत्त्व असतं. फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही, तर त्यातून एक वेगळा आनंद मिळतो की, जो मनाचं समाधान करतो.
  • खायला काय आवडतं? – शाकाहारी, मांसाहारी दोन्ही आवडतं, पण मासे जास्त आवडतात. चटपटीत जास्त आवडतं. साधं जेवण घरी जेवतो आणि चटपटीत जेवण बाहेर जेवायचं असतं.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – आपल्याला जे हवं ते व्यवस्थित आणि त्याचं प्रमाण आटोक्यात ठेववां. यासोबत व्यायाम करावा. खाताना भान ठेवावं, असं मला वाटतं.
  • डाएट करता का? – अजिबात नाही. याचं कारण, फक्त डाएट करून काही होत नाही. शारीरिक हालचाल आणि व्यायामाचीही खूप आवश्यकता असते.
  • आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – गेली 30-35 वर्षे बाहेरच खातोय. रोज सकाळ-संध्याकाळ.
  • कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – पूर्वी आमचा जिप्सी चायनिज हा एक अड्डा होता. हल्ली आम्ही मासे खाण्यासाठी चैतन्यमध्ये जातो. आमची एक मैत्रीण राधिका म्हणून ती घरी सीकेपी पद्धतीचं उत्तम जेवण घरी बनवते. ती मला पाठवते. मी सीकेपी नसलो तरी सीकेपी पदार्थ हे माझ्या मते जगातलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट अन्न आहे. कारण सीकेपी महिला प्रेमाने अन्न बनवतात आणि खाऊ घालतात. असं फार कमी ठिकाणी घडतं.
  • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – काहीही सांभाळत नाही. याउलट कोकणातल्या ज्या गावी जातो तिथे बनवला जाणारा पदार्थ खातो. कोकण आणि गोवा ही दोन्ही ठिकाणं मला खाण्यासाठी आवडतात. गोव्यात मिळणारे मासे अतिशय ताजे असतात. त्यामुळे त्याला वेगळी चव असते. सर्वसाधारणतः मासे घरी खावेत, कारण घरी आणि उपाहारगृहात केलेले मासे यांची चव वेगळी असते. घरचे मासे जास्त रुचकर असतात, मात्र गोव्याचं वैशिष्टय़ असं की, तिथे घर आणि हॉटेलात बनवलेल्या माशांमध्ये फारसा फरक आढळत नाही.
  • स्ट्रीट फूड आवडतं का? – वडापावपासून चाटमधले सगळे पदार्थ आवडतात.
  • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – जे मी स्वतः बनवतो असा अंडय़ाचा कुठलाही पदार्थ मला घरी खायला आवडतो.
  • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता ? – बाहेरून मागवतो,पाहुण्यांच्या आवडीने त्यांना विचारून खाऊ घातलेलं बरं असतं. घरी बनवलेलं आवडलं नाही तर त्याचा उपयोग काय!

बोंबलाचं भुजणं

 खूप मोठे बोंबिल असतील तर दोन तुकडे करायचे आणि लहान असतील तर तसेच अख्खे ठेवायचे. चांगले धुऊन घ्यायचे. त्यांना चवीनुससार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर लावून ठेवायची. 2 कांदे, 1 इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 ओल्या हिरव्या मिरच्या व मूठभर कोथिंबीर हे सर्व अगदी बारीक चिरून घ्यायचं. मिक्सरमध्ये खोबरं कमीत कमी पाणी घालून वाटायचं. वाटताना 1 चमचा तांदळाचं पीठ घालायाचं. पुन्हा वाटायचं. बोंबलांत तिखट-मीठ मुरत असतं. काही जण खोबरं न वाटता तसंच घालतात. तर काही जण खोबरं वाटताना अगदी थोडं थोडं आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पण वाटतात. जेवणाची वेळ होत आली की, कढईत 1 पळीभर तेल गरम करायचं. त्यात कांदा मऊ होईपर्यंत परतायचा. मग मिरच्या-आलं-लसूण घालून आणि थोडा वेळ परतायच. वाटलेलं खोबरं घालायचं. पाणी घालायचं नाही. बोंबलाला मीठ लावलेलं असल्यामुळे अगदी बेताने मीठ घालायचं. उकळी आली की अलगद बोंबिल सोडायचे. बोंबिल खूप नाजूक असतात. पटकन शिजतात. खूप ढवळायचं नाही. कोथिंबीर घालून पुन्हा एकदाच हलक्या हाताने ढवळा. गरम गरम चपाती आणि भात दोन्हीबरोबर छान लागतं.