मंत्रालय बनलंय आत्महत्यालंय; शेतकऱ्यांची चेष्टा, मस्करी करू नका!

1
ajit-pawar

सामना प्रतिनिधी । मुंबई

कर्जमाफी, बोंडअळी, गारपिटीचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.मंत्रालयात येवूनही न्याय मिळत नसल्याने मंत्रालय हे आत्महत्यालय बनलय. शेतकऱ्यांची चेष्टा, मस्करी करू नका, सरकारवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. मंत्र्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करीत पिसे काढली.

कर्जमाफी, बोंडअळी, गारपीट या विषयावरील प्रस्तावावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सचिवालयाचे मंत्रालय झाले. परंतु मंत्रालयात येऊनही न्याय मिळत नसल्याने शेतकरी, बेरोजगार तरूण आत्महत्या करीत असल्याने मंत्रालय हे आत्महत्यालय बनले आहे. नुसत्या जाळया बसवून उपयोग नाही. मंत्रालयात जनतेची कामे होतात असा विश्वास वाटला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

कॅबिनेटच्या बैठकीला मंत्री हजर राहतात त्यानंतर मात्र गायब होतात. मंत्र्याच्या कारभारावर मुख्यमंत्र्याचे नियंत्रण राहिलेले नाही. कर्जमाफीची घोषणा होवून वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी राणा भिमदेवीच्या थाटात ३४ हजार कोटीची आणि ८९ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेले नाही. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, पटलावर ठेवा,अशी मागणी करूनही सरकारकडून यादी जाहीर केली जात नाही. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे कधी मदत मिळणार असा सवाल केला. गारपीटीची मदत अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडला आहे. धर्मा पाटील यांनी अनेक मंत्र्याना निवेदने दिली. परंतु न्याय मिळाला नाही. भाजपच्या एका मंत्र्याने धर्मा पाटील यांना दलालामार्फत प्रस्ताव दाखल केला असता तर कोटीमध्ये अनुदान मिळाले असते असा सल्ला दिला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

कर्जमाफीची यादी द्या
कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही सरकारकडून कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. शिवसेनेने वारंवार कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागितली. परंतु सरकार यादी देण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ३४ हजार कोटी आणि ८९ लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करा अशी मागणी शिवसेनेचे सदस्य सुभाष साबणे, चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत केली.