अजित वाडेकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रीडा, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात सेवाभावी उपक्रम राबवणाऱया डॉ. दयाल फाऊंडेशनने संस्थापक दिवंगत डॉ. शंकरेश्वर दयाल यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदुस्थानचे माजी क्रिकेट कर्णधार व माजी व्यवस्थापक अजित वाडेकर यांचा डॉ. रामेश्वर दयाल जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला. याप्रसंगी क्रिकेट प्रशिक्षण, व्यवस्थापन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, समाजसेवा व वैद्यकीय संशोधनात उल्लेखनीय कार्य करणाऱया मान्यवरांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी क्रिकेटपटू रॉबीन उत्थप्पा, फाऊंडेशनचे अध्यक्ष निशांत दयाल हे उपस्थित होते.

बिहारची राजधानी पाटणात आपल्या वैद्यकीय व समाजसेवेचा श्रीगणेशा करणारे डॉ. शंकरेश्वर दयाल, दिवंगत डॉ. रिता दयाल यांनी साकारलेल्या समाजसेवी कार्याला वंदन करण्यासाठी गेली दोन वर्षे डॉ. दयाल फाऊंडेशन या पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन करीत आहे. यंदाच्या सोहळय़ात अजित वाडेकर यांच्यासह क्रिकेटर अमोल मुजुमदार (डॉ.एस.दयाल ऍवार्ड ऑफ एक्सेलन्स इन स्पोर्टस्), माजी कसोटीपटू प्रवीण अमरे (डॉ. एस. दयाल ऍवार्ड ऑफ एक्सेलन्स इन फिल्ड ऑफ स्पोर्टस् कोचिंग), प्रा. रत्नाकर शेट्टी (डॉ. एस. दयाल ऍवार्ड ऑफ एक्सेलन्स इन फिल्ड ऑफ स्पोर्टस् ऍडमिनिस्टेशन) यांचाही सन्मान करण्यात आला.