हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन

45

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदू राष्ट्र स्थापनेची जनभावना जगभरात पोहचवण्यासाठी गोव्यात सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन १४ ते १७ जून रोजी श्री रामनाथ देवस्थान, फोंडा येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी हिंदुस्थानमधील २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील १५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणारे हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधी मंदिररक्षण, गोरक्षण, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर या समस्यांसह कश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, बांगलादेशींची घुसखोरी, देशातील विविध भागांत सुरू असणारे हिंदूंचे विस्थापन आदी समस्यांबाबत कृती कार्यक्रम निश्चित करणार आहेत. शिवाय बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचा वंशविच्छेद रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करायला हवेत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी दिली. यावेळी डॉ. उपेंद्र डहाके, अॅड. संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आदी उपस्थित होते.

१९ ते २१ जून हिंदू राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशन
राष्ट्र आणि धर्माचे काम करताना संघटक आणि कार्यकर्त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर मात करता यावी, अंगीभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी १९ ते २१ जून रोजी बांदिवडे, गोवा येथील महालक्ष्मी मंदिरात ‘हिंदू राष्ट्र संघटक’ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये माहिती अधिकार कायद्याचा वापर, वैध मार्गाने आंदोलन कसे करावे, व्यक्तिमत्त्व विकास आदींचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या