अखिलेश यादव मायावतींच्या भेटीला, पुढचे पाऊल उचलण्याचे संकेत

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. यानंतर विरोधी पक्षनेते तिसऱ्या आघाडीसाठी एकमेकांच्या भेटी घेऊन याबाबत विचार आणि चर्चा करत आहेत. सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये आघाडी केलेल्या बसपा आणि सपा प्रमुखांनी एकमेकांची भेट घेऊन आता पुढचे पाऊल टाकण्याचे संकेत दिले आहेत.

सोमवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची भेट घेतली. अखिलेश यांनी मायावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. याचा एक फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी आता पुढचे पाऊल टाकण्याची तयारी (अब अगले कदम की तैयारी) असे कॅप्शन दिले आहे.

युपीमध्ये भाजपला फटका

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोलने वर्तवली आहे. युपीमध्ये सपा-बसपाच्या आघाडीमुळे भाजपने 2014 मध्ये मिळवलेल्या जागा ते राखू शकणार नाहीत असे दिसत आहे.

विरोधकांच्या भेटीगाठी

याआधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमध्ये दोनदा भेट घेतली. तसेच नायडू सोमवारी पश्चिम बंगालमध्ये गेले असून तेथे ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. एक्झिट पोलनंतर विरोधकांची धास्ती वाढली असल्याचे हे चित्र आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या