अकलूजमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

3

 

अकलूज– शहरातील गजबजलेल्या संग्रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात बंदूकधार्‍यांनी गुरुवारी नानासाहेब दिलीप आसबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले. गोळीबारात आसबे गंभीर जखमी झाले आहेत. अनिकेत उंबरे यांनी या घटनेची पोलिसांत फिर्याद दिली. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नानासाहेब आसबे हे आज सकाळी अश्‍विनी हॉस्पिटलशेजारी अनिकेत जालिंदर उंबरे (रा. जाधववस्ती-उंबरे, ता. इंदापूर) यांच्यासह बसले असताना दोन अज्ञात बंदुकधारी दुचाकी वरून तेथे आले. हॉस्पिटलचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. याचा फायदा घेत, तोंडाला कापड बांधून आलेल्या हल्लेखोरांनी अगोदर नाना आसबेंना ‘नाना’ म्हणून हाक मारली. त्यांनी ‘ओ’ देताच बंदुकधार्‍यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी आसबेंच्या हातात घुसली. त्यावेळी नाना आसबे पळून जात असताना त्यांच्यावर दुसरी गोळी झाडण्यात आली. दुसरी गोळी खांद्यामध्ये घुसली. गोळीचे छर्रे आसबेंच्या पोटात, छातीवर व डोक्यात घुसले आहेत. आसबेंच्या शेजारी बसलेल्या अनिकेत उंबरे याच्या हातातही बंदुकीचे छर्रे घुसून ते जखमी झाले आहेत. गोळीबार होताच परिसरात पळापळ सुरू झाली.

एका बंदुकधार्‍याने नाना आसबेंवर फायरिंग केली तर दुसरा बंदुकधारी घाबरवण्यासाठी लोकांच्या दिशेने बंदूक ताणून उभा होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्लेखोर गर्दीचा फायदा घेत मोटारसायकलवरून पळून गेले. लोकांची पळापळ उठताच परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने पटापट बंद केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. बंदुकीतून झाडलेल्या गोळीची पुंगळी, घटनास्थळी पडलेले पेन, बूट पोलीसांनी जप्त केले आहे.

जखमी नाना आसबेंना अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संजय सुर्वे घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांच्या शोधासाठी तातडीने तपास पथके पाठवून नाकाबंदी करण्यात आली. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डीवायएसपी निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबल, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सन २००६ मध्येही झाला होता हल्ला
– नाना आसबेंवर सन २००६मध्ये हल्ला करण्यात आला होता. यानंतर २००८मध्ये झालेल्या दादा तांबोळी हत्याप्रकरणी आसबेंवर ३०२चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सन २०१५मध्ये भैय्या देवकर हत्याकांड घडून आले. या सर्व घटनांकडे पाहता नाना आसबेंवर झालेला हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.