शुभमुहूर्त

>> मीना आंबेरकर

अक्षयतृतीया… साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस… या दिवशी विवाह मुहूर्त, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो.

चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचेच समजले जातात. त्यातील चैत्र हा वसंताच्या सौंदर्याने नटलेला, परंतु वैशाख हा पूर्णतः वेगळाच. सर्वत्र कडक रखरखीत उन्हाळा. वैशाख वणवा पेटलेला.अंगाची लाही लाही होत असते, जीव नकोसा झालेला अशा या रखरखीत वातावरणात निसर्गाचा एक हिरवा चमत्कार दिसून येतो. झाडावेलींना सर्वत्र हलकीशी हिरवी पालवी फुटत असते. रानफुलांचा मधूर सुगंध दरवळत असतो. डेरेदार आम्रवृक्षाला सुमधुर आंबे लटकलेले असतात. कोकीळ कुजन ऐकू येते. याच वैशाख महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळी विशाखा नक्षत्र आकाशात उगवते. म्हणून या महिन्याचे नामकरण वैशाख असे झाले. वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया असे नामाभिधान आहे. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा दिवस शुभकार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद समजला जातो. काहींच्या मते अक्षय्यतृतीया कृतयुगाचा प्रारंभ आहे. काहींच्या मते तो त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. यासंबंधी मतभेद असले तरी त्रेतायुगाचा प्रारंभ या तिथीला झाला असे मानतो.

अक्षयतृतीयेच्या संदर्भात एक कथा अशी सांगितली जाते. फार फार वर्षांपूर्वी कुशावती नावाचे एक शहर होते. तिथे एक राजा होता. तो सदा चैनीत, ऐषआरामात राहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करायचा. त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याचे अधिकारी प्रजेवर अन्याय करीत, लोकांचा छळ करीत. राजाने त्या अन्यायाची दखलच कधी घेतली नाही. अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करणार कोण? सर्वजण धास्तावले. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी होते. राजाला या तपस्व्याबद्दल कमालीचा आदर होता हे लोकांना माहीत होते. लोकांनी एक युक्ती केली. लोक त्या तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख ऋषींना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी राजवाड्य़ात गेले. त्यांनी राजाची चांगलीच कानउघाडणी केली. आपण प्रजेवर अन्याय करीत आहोत, आपल्यामुळे आपली प्रजा दुःखी आहे याची जाणीव राजाला झाली. त्यांनी ऋषीवर्यांचे पाय धरले आणि प्रजेला सुखी करण्याचे त्यांना वचन दिले. ऋषीवर्यांनी राजाला कल्पना दिली की, ‘‘हे राजा, पूर्वजन्मी तू एक गरीब ब्राह्मण होतास, परंतु तुझ्या अक्षय्य पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरीबांना दानधर्म केल्यामुळे अक्षयतृतीयेचे दानक्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन तुला यातना भोगाव्या लागतील. ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर त्याने अन्नदान, जलकुंभे दान केले. लोक संतुष्ट झाले. प्रजा सुखी झाली. तेव्हापासून लोक भर उन्हाळ्य़ात यावेळी अनेक ठिकाणी गार पाण्याने माठ, रांजण भरून ठेवतात. कडक उन्हात वाटेने जाणाऱ्या-येणाऱ्या वाटसरूचा जीव कासावीस होतो. अशावेळी हे व्याकूळ जीव थंडगार पाण्याने आपली तृष्णा भागवतात. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी अनेक जण अन्नदान करतात, पाणपोई सुरू करतात.

या अक्षय्यतृतीयेच्या व्रतात जलदानाला, अन्नदानात विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला शक्य होईल असे अन्नदानासारखे पुण्यकृत्य केल्याने आपल्याला समाधान लाभेल. अक्षय्यतृतीयेला परशुराम जयंती म्हणूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान परशुराम महापराक्रमी. त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चिपळूण शहराजवळ महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामांचे पावन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री भगवान परशुराम म्हणजे अतुलनीय शौर्य. त्यांच्या चरित्रकथेवरून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मानवजातीला मिळते. आज आपले अनेक जवान परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण करीत आहेत. यासाठी काहींना हौतात्म्यही पत्करावे लागले. त्यांचा यथोचित सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देणे, मदत करणे या गोष्टी आवश्यक असतात. अशी संधी उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा घेऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल व त्यांचे ऋण कुठे तरी हलके करण्याचा तो प्रयत्न ठरेल.