माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी अलंकापुरीत भाविकांचा हरिनामाचा गजर

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विना मंडपातून मंगळवारी (21 जून) हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे. लाखो भाविक हरिजागर करीत आळंदीत आले आहेत. भाविक,वारकरी यांच्या गर्दीने रस्ते फुलले आहेत. आळंदीत हरिनाम गजर, कीर्तन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम,अन्नदान सेवा उत्सव सुरु असून टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनादात भाविक जयघोष करीत आहेत.

अलंकापुरी भक्ती रसात न्हाऊन निघाली असून ऊन सावल्यांचे आल्हाददायक वातावरणात हरिनाम गजर होत आहे. सोमवारी (दि.20) अंकलीहून श्रींचे मोती, हिरा अश्व नामगजरात आळंदीत दाखल झाले. प्रस्थान सोहळ्याची मंदिरासह आळंदीत प्रभावी पणे तयारी झाली आहे. यात आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हा महसूल, पोलीस, आरोग्यसेवा, वीज महावितरण विभाग देखील सरसावले. श्रींच्या प्रस्थानला भाविकांची सोय करण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे. सुविधांसाठी आदेशा प्रमाणे काम करण्याची लगबग अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई ,पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माउली वीर,श्रीधर सरनाईक यांनी मंदिरात प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. माऊली मंदिरात भाविकांना प्रस्थान दिनी तसेच सोहळ्यात ग्रंथ संपदा , श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे महादेव रत्नपालखी यांनी सांगितले. खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांचे नियंत्रणात नगरपरिषदेच्या वतीने तहसीलदार तथा प्रशासक वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदीत येणाऱ्या भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यास तत्पर दिसत आहेत. यासाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी यात्रा काळात नागरी सुविधां मुळे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतल्याचे सांगितले.

भगवी पताका उंचावत ज्ञानोबा-माउली-तुकोबाचे नामगजरात अलंकापुरी दुमदुमली आहे. परिसर भक्तिमय झालेले आहे.पवित्र इंद्रायणी नदी पाण्याने दुथडी भरून वाहते आहे. यामुळे स्नानाची सोय झाली आहे. भाविकांनी देखील पहाटे पासून नदीला स्नानास गर्दी केली. नदीवर स्नान, प्रदक्षिणा, श्रींचे देवदर्शन धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत सोहळ्यात सहभागी झाले. इंद्रायणी नदीचे दुतर्फा भाविकांची गर्दी झाल्याने नदी घाटावर वैभव वाढले.आकर्षक लक्षवेधी विद्युत रोषणाईने नदीचा परिसर लख्ख उजळला. हजारो भाविकांनी श्रींचे दर्शनबारीतून समाधीचे दर्शन घेतले.गेल्या तीन दिवसांपासून दिंड्याचे आगमन होत आहे.

ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांची वाहने, दिंड्या प्रवेश करीत आहे. खांद्यावर भगवी पताका, तुळशी, हातात टाळ आणि मुखात हरिनाम गळ्यात विना घेत वारकऱ्यांचा ओघ आळंदीकडे सुरूच आहे. भजन, अभंग, टाळ, मृदंगाचे वाद्यात नामजयघोष सुरु आहे. इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

महाद्वार, मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. तीर्थक्षेत्रातील मठ, मंदिरे, धर्मशाळा, नदी किनारा, गोपाळपूर, नगरपरिषदेच्या शाळेची मैदाने भाविकांचे गर्दीने गजबजली आहे. खुल्या जागेत भाविकांनी राहुट्या, तंबू उभारले असून पावसासाठी निवाऱ्याची सोय झाली आहे.आळंदीला फिरत्या यात्रेचे स्वरूप आले आहे. गेल्या दोन वर्षात पायी वारी न झाल्याने यावर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धार्मिकतेतून मैदाने गजबजून गेली आहे. हरिनामाचा गजर वाढला आहे.

राज्यातून आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यावर भाविकांची आणि दिंड्याचा गजर पाहण्यास मिळत आहे. वाहनांतून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. पायी वारी करीत येणारे भाविक विसावा घेत आळंदीकडे पाऊले पडत आहेत. ऊन ,सावलीचे खेळात आल्हाददायक वातावरणात बदल झालेला आहे. यास भक्ती रसाची जोड मिळाली आहे. भाविकांची मांदियाळी आळंदीत आली आहे. महिला, वृद्ध तसेच तरुण वारक-यांची संख्या मोठी आहे. श्री विठुरायांचे भेटीला जाण्यास माऊलींचे वारीत भाविक येत आहेत. यामुळे भाविकांची गर्दी अधिकाधिक वाढली आहे.

आळंदीत पोलीस बंदोबस्त तैनात झाल्याने तीर्थक्षेत्र आळंदीला छावणीचे स्वरूप आहे. शहरात मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग, गोपाळपूर, इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा, चौकातील टेहळणी मनोरे आदी ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आळंदीत दर्शनबारी,आजोळघर येते देखील पोलिसांचा खडा पहारा आहे. मंदिर परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले असून फार वेळ भाविकांना थांबून दिले जात नाही. रस्त्यावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याने यावर्षी रस्ते वाहन मुक्त दिसत आहेत. केवळ सोहळ्याची वाहने पास दाखवून सोडली जात आहेत.

भाविकांचे सुरक्षिततेसाठी दक्षता घेत पोलीस प्रशासनाने सूचनांचा वर्षाव पी.ए .सी यंत्रणेत सुरू केला आहे. अधिकची काळजी घेत दक्ष राहण्यास भाविकांना आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांनी गस्त वाढविली आहे. आळंदीत येण्यास सार्वजनिक बस व्यवस्था , खाजगी वाहने उपलब्द्ध झाल्याने भाविकांची चांगली सोय झाली. याशिवाय दिंड्यांची खाजगी वाहनांनी भाविक येत आहेत. आळंदीत वाहन प्रवेशावर मर्यादा आली आहे.पास शिवाय आळंदीत वाहनांना प्रवेश दिले जात नाहीत. पार्किंगची व्यवस्था असलेली वाहने आळंदीत प्रवेशत आहेत. यात्रेस गॅस इंधन पुरवठा सुरु केला आहे. पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा अडचण आल्यास पुरवठ्यासाठी चावडी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मंडलाधिकारी स्मिता जोशी यांनी केले आहे.

आळंदी देहू परिसर विकास समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नदी घाटावर लोकशिक्षणाचा उपक्रम डॉ. विश्वनाथ कराड यांचे माध्यमातून सुरु झाला आहे. येथील कीर्तन, प्रवचन, भजन, जागर, घंटानाद लोकशिक्षणपर उपक्रम राबविले जात आहेत. यास भाविकांची गर्दी होत आहे. आळंदी देवस्थानची दर्शनबारी कमी पडत असल्याने दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून आणली आहे. भाविक रांगेत उभे राहत श्रींचे दर्शनास येत आहेत. नगरप्रदक्षिणा मार्ग प्रशस्त झाल्याने प्रदक्षिणा प्रशस्त झाली आहे. रहदारीला खड्डे नसल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. यामुळे गर्दीचे वेळी भाविकांची रहदारीत गैरसोय होणार नसल्याने नगरपरिषद प्रशासनाचे आळंदीत कौतुक होत आहे. श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी होत आहे. पहिला मुक्काम जुन्या गांधी वाड्याचे जागेत आजोळघरी समाज आरतीने होणार आहे. रात्री जागर आणि मुक्काम पाहुणचाराने सोहळा पुण्य नगरीला जाण्यास बुधवारी भल्या पहाटे दोन दिवसांचे मुक्कामास मार्गस्थ होईल.