दारूबंदी वेगाची नशा उतरवणार

1
  • राजा गायकवाड

र्षानुवर्षे दारूच्या नशेत आणि ‘सोचेंगे तुम्हे प्यार’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है’ ही कुमार शानूने गायलेली दर्दभरी गाणी ऐकत सलग बारा – बारा तास स्टेअरिंग फिरविणारा ड्रायव्हर आणि त्याला साथ देणारा क्लिनर, हे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील टिपिकल ड्रायव्हर लाइनचे चित्र. तर दुसरीकडे फक्त मौज-मजा आणि थ्रीलसाठी दारू पिऊन वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा तरुण वर्ग. एकीकडे पोटासाठी तर दुसरीकडे मौजेसाठी केलेला वेगाचा अट्टहास. मात्र या दोघांमध्येही समान दुवा आहे तो ‘दारूचा’. हा दुवाच आता सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ‘नो दारू’ असा आदेश न्यायालयाने दिल्याने कित्येकांचे जीव आणि संसार वाचणार आहेत. दारू पिऊन वाहन चालविणे म्हणजे एकप्रकारे यमराजाला ‘इन्व्हिटेशन’ देण्यासारखेच आहे. दारू न पिल्याने कोणाचा प्रवास थांबणार नाही, अपघात मात्र नक्कीच थांबणार आहेत.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गंवर ठिकठिकाणी दारू विक्रीची दुकाने (वाईन शॉप, बीअर शॉप), परमिटरूम, बार आहेत. त्यामुळे अनेक शौकिनांना प्रवासात दारू पिण्याचा मोह आवरत नाही. या मार्गावर सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याने अनेक मालवाहतूकदार, तरुण वर्ग दारू रिचवतात आणि प्रवास करतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ८० किमी प्रतितास हा नियम जरी असला तरी सर्वसामान्यपणे प्रतितास १०० किमीच्या वेगाने वाहने चालविली जातात. त्यातच जर ड्रायव्हर दारूच्या नशेत असेल तर हा वेग प्रतितास १२० किमीवर पोहचतो. त्यामुळे अनेकदा गाडी कंट्रोल होत नाही. दारूच्या नशेत वळणावर किंवा इतर धोकादायक ठिकाणी हमखास अपघात होतात. यामध्ये सर्वाधिक प्रमाण मालवाहतूक गाड्या आणि तरुणांचे आहे. महामार्गांवरील पोलीस सुट्टीच्या काळात, वीकेंडला मोठ्या प्रमाणात ‘ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह’ करण्याऱ्यांवर कारवाई करतात. मात्र एकंदरीतच पोलिसांची संख्या, कारवाईची पद्धत पाहता ही कारवाई खूपच जुजबी ठरते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता या महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारे दारू विक्री करता येणार नाही. हा निर्णय म्हणजे मुळावर केलेला घाव आहे. महामार्गावर दारूच मिळाली नाही तर लोक पिणार नाही. परिणामी अपघातांवर नियंत्रण येणार आहे, असे महामार्ग अभ्यासक तन्मय पेंडसे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून पुणे – मुंबई एक्स्पेस वेपासून ते विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांचा अभ्यास केला आहे. हे मार्ग निर्मिती करताना झालेल्या चुका प्रशासनाच्या निदर्शनात आणू दिल्या आहेत. मात्र सदोष रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांपेक्षाही अनियंत्रित वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. दारूच्या नशेत गाडी चालविल्याने फक्त आपल्याच नाही तर समोरच्याच्या जीवालाही मोठा धोका असतो. न्यायालयाच्या या आदेशामुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहेत. प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घरी कोणी ना कोणी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असते. त्या सगळ्यांच्या डोळ्यांतील काळजी न्यायालयाने कमी केली आहे. असेही पेंडसे यांनी सांगितले.

दारूबंदीतून पळवाट काढण्यासाठी महामार्गांचे संबंधित महापालिकांकडे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला यशही येऊ शकते. मात्र त्यातून फक्त दारूविक्रेत्याचे भले होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला दु:खच येणार आहे. वर्गीकरण केल्यानंतर त्या महामार्गाची सर्व जबाबदारी पालिकेला उचलावी लागणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवरही ताण पडणार आहे. तसेच दारूविक्री सुरू राहिल्यामुळे अपघातांची परिस्थिती ‘जैसे थी’च राहणार आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हरमनसिंग सिद्धू यांच्या लढ्याला यश
कॅनडात कायमचे स्थायिक होण्यासाठी निघालेल्या हरमनसिंग सिद्धू यांच्या कारला हिमाचल प्रदेशात २४ ऑक्टोबर १९९६ रोजी अपघात झाला. या अपघातात ते कायमचे अपंग झाले. गेल्या वीस वर्षांपासून ते व्हीलचेअरला खिळून आहेत. मात्र या अपघाताने खचून न जाता रस्ते सुरक्षा या विषयावर काम करायला त्यांनी सुरुवात केली. दारू पिऊन वाहन चालविणे आणि महामार्गावर सहज उपलब्ध होणारी दारू या विरोधात त्यांनी २०१२ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या सतत पाच वर्षांच्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने यश मिळाले आहे. दारूबंदीच्या लढ्यानंतर सिद्धू यांनी आता रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्यात साडेतीन लाख लोक बेरोजगार
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राज्यातील दहा हजार हॉटेल, परमिट रूम, बीअर बार बंद झाले आहेत. परिणामी साडेतीन लाख बेरोजगार झाले आहेत. यात मुंबईतील ४५० हॉटेल्स बंद झाली आहेत, तर पुणे जिल्ह्यातील १६०० हॉटेल्सचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना दारूविक्रीवर अवलंबून असलेल्या लोकांच्याही रोजगाराचा विचार करायला हवा होता. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातही असाच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तेथील सरकारने महामार्ग वर्गीकरण (हायवे डिनोटिफिकेशन) करून दारूविक्री व्यासायिकांना रोजगाराची संधी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हायवे डिनोडिफाय करावेत अशी आमची विनंती आहे, असे आहार इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान गोव्याची संपूर्ण आर्थिक परिस्थिती दारूविक्रीवर अवलंबून आहे. त्यामुळेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठे बीअर बार, वाईन, बीअर शॉपीचे व्यवसाय वाढीस लागले आहेत. अनेक नागरिकांचे पोट याच व्यवसायावर चालते. न्यायालयाच्या निकालामुळे गोव्याची संपूर्ण आर्थिक घडी बिघडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही तर विकृती
व्यसन आणि व्यसनातून येणारी विकृती या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दारू पिणे हे व्यसन आहे. मात्र दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालविणे ही विकृती आहे. या विकृतीमुळेच दरवर्षी लाखो जीव जातात. दारूमुळे मेंदूवरील नियंत्रण सुटल्यानंतर मनात असे वेगवेगळे विचार येतात. त्यातून या घटना घडतात, असे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. अजय दुधाने यांनी स्पष्ट केले.