अलिबागचे पर्यटन व्यापाऱयाला पडले पावणेनऊ कोटीला

सामना प्रतिनिधी। अलिबाग

मीरा रोडच्या व्यापाऱयाला आणि त्यांच्या मित्राला अलिबागचे पर्यटन तब्बल पावणेनऊ कोटीला पडल्याची घटना उघडकीस आली आहे. पर्यटनादरम्यान भेटलेल्या एका भामटय़ाच्या आमिषाला बळी पडून बिटकॉईनमध्ये केलेली कोटय़वधीची गुंतवणूक फसल्यानंतर या व्यापाऱयाला आपल्याला चुना लागल्याचे लक्षात आले. भामटय़ाचा शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर या व्यापाऱयाने अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील मीरा रोड परिसरात राहणारे परेशभाई कारिया हे आपल्या मित्रासह ऑगस्ट 2017 मध्ये अलिबाग येथे फिरायला आले होते. त्या मित्राने त्यांची ओळख सुरत येथील राकेश किरजीया यांच्याशी करून दिली. त्यावेळी आरोपी राकेशने या दोघांना बिटकॉईनमध्ये असलेली क्रिप्टो करन्सी ही हेक्टाईन आणि झेक्सोको कॉईनमध्ये परावर्तीत केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल असे आमिष दाखवले. त्याला भुलून कारिया व त्यांच्या मित्राने 8 कोटी 46 लाख 15 हजार 664 रुपये बिटकॉइनमध्ये गुंतवले. मात्र दोन वर्षे उलटूनही त्याचा लाभ मिळत नसल्याने चौकशी केली असता आपण फसवले गेल्याचे त्यांना कळले. या दोघांनी राकेशकडे पैशांची मागणी केली, परंतु राकेशने त्यांना पैसे तर दिले नाहीच उलट ठार मारण्याची धमकी दिली.

बंद वेबसाइटचा स्क्रीन शॉट दाखवून लावला चुना

झेक्सोको कॉईनची वेबसाइट बंद पडलेली असतानाही राकेश विरजीया याने त्याचे स्क्रीन शॉट दाखवून त्यावर पैशांची एण्ट्री केल्याचे दाखवले. तसेच गुंतवणूक प्रक्रिया सुरू असल्यासंबंधीचे कागदपत्र या दोघांना दाखवले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून या दोघांनी एवढी मोठी रक्कम गुंतवली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्केषण शाखेचे पोलीस निरीक्षक ए. जे. शेख तपास करीत आहेत.