सरपंच पदासाठी 374 तर सदस्य पदासाठी 2358 उमेदवारी अर्ज दाखल

2

सामना प्रतिनिधी। अलिबाग

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 9 फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 90 सरपंच पदाच्या जागेसाठी 374 तर 845 सदस्यपदाच्या जागेसाठी 2358 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर 13 फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीत किती उमेदवार उभे राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच व सदस्य पदासाठी 24 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. यासाठी 4 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची 9 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असल्याने या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे जिल्हयातील ग्रामपंचायतीची ही निवडणूक लोकसभेची झलक आहे.

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या जागेसाठी 122, मुरुड 3 जागेसाठी 13, पेण 5 जागेसाठी 26, पनवेल 2 जागेसाठी 13, उरण एक जागेसाठी 3, कर्जत 8 जागेसाठी 47, माणगाव 10 जागेसाठी 40, तळा 5 जागेसाठी 14, रोहा 6 जागेसाठी 25, महाड 17 जागेसाठी 46, श्रीवर्धन 4 जागेसाठी 9 तर म्हसळा 4 जागेसाठी 16 असे एकूण 374 उमेदवारी अर्ज थेट सरपंच पदासाठी दाखल झाले आहेत
तर 845 सदस्य पदाच्या जागेसाठी अलिबाग तालुक्यातील 269 जागेसाठी 957, मुरुड 33 जागेसाठी 93, पेण 60 जागेसाठी 155, पनवेल 22 जागेसाठी 74, उरण 9 जागेसाठी 31, कर्जत 82 जागेसाठी 320, माणगाव 90 जागेसाठी 205, तळा 35 जागेसाठी 51, रोहा 56 जागेसाठी 132, महाड 127 जागेसाठी 239, श्रीवर्धन 28 जागेसाठी 39 तर म्हसळा 34 जागेसाठी 62 असे एकूण 2358 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

छाननी अर्जानंतर 13 फेब्रुवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नक्की थेट सरपंच व सदस्य पदाच्या जागेसाठी उमेदवार उभे राहणार हे कळणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातर्फे आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.