अलिबाग रेल्वे पॅसेंजर फेब्रुवारीपासून आरसीएफ रुळावर धावणार – अनंत गीते

8

सामना प्रतिनिधी । अलिबाग

केंद्रीय रेल्वे मंत्रालय, केमिकल व फर्टिलायझर मंत्रालय मध्ये करार प्रक्रिया पूर्ण झाली असून फेब्रुवारी महिन्यात अलिबाग रेल्वेचे भूमिपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करणार असल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे अलिबाग तालुका हा आता रेल्वेनेही जोडला जाणार आहे.

अलिबागमध्ये रेल्वे येणार असे प्रत्येक भाषणात अनंत गीते उल्लेख करीत असतात. रोहा येथे कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, अलिबाग रेल्वे पॅसेंजर आणण्याचे माझे स्वप्न असून याबाबत माझा पाठपुरावा हा अंतिम टप्यात आला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल, केमिकल फर्टिलायझर मंत्री सदन गौडा आणि माझी संयुक्त बैठक झाली आहे. रेल्वे मंत्रालय हे जमीन जोपर्यत रेल्वेच्या नावावर होत नाही तोपर्यत गुंतवणूक करीत नाही.

आरसीएफची रेल्वे लाईन जमीन ही लीजवर देण्याचा निर्णय दोन्ही मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही मंत्रालयात यावर करार होणार असल्याने अलिबाग हा रेल्वेने जोडला जाणार आहे. त्यामुळे आरसीएफ च्या रेल्वे लाईनवर आता पॅसेंजर रेल्वे धावणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अलिबाग रेल्वेचे भूमीपूजन रेल्वेमंत्री पियुष गोयल हे करणार असल्याचे गीते यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे अलिबाग मध्ये रेल्वे येण्याचे अलिबागकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.