तीन लाख अलिबागकरांसाठी खूशखबर…

489

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील तीन लाख ग्रामस्थांसाठी खूशखबर आहे. रोहा-दिवा मेमू आणि पनवेल-कर्जत लोकलनंतर आता अलिबाग ते पनवेल पॅसेंजर धावणार आहे. आरसीएफच्या रुळांवरूनच ही रेल्वे सेवा सुरू होणार असून फेब्रुवारी महिन्यात या पॅसेंजर सेवेचा नारळ फुटणार आहे.

मांडवा जेट्टीवरून गेटवे ऑफ इंडियापर्यंत कॅटमरान सेवा सुरू झाल्याने त्याचा फायदा असंख्य चाकरमान्यांना झाला. अवघ्या 40 मिनिटांत अलिबाग गाठता येत असल्याने पर्यटकांचा मोठा ओढा अलिबागकडे वळला, परंतु सर्वसामान्य अलिबागकरांच्या आवाक्यापलीकडे हे तिकीट दर असल्याने त्यांना एसटीने पनवेल तसेच मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो. पण आता रेल्वेने मुंबई गाठण्याचे त्यांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

आरसीएफची रेल्वे लाइन रेल्वेने लीजवर घेतली
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी रोह्यात पत्रकारांशी बोलताना अलिबाग ते पनवेल पॅसेंजर सुरू करण्याचे काम फास्ट ट्रकवर असल्याची माहिती दिली. कोणतीही जमीन जोपर्यंत नावावर होत नाही तोपर्यंत रेल्वे मंत्रालय त्या प्रकल्पात गुंतवणूक करत नाही. त्यामुळे आरसीएफची रेल्वे लाइन जमीन ही रेल्वेला लीजवर देण्याचा निर्णय केमिकल व फर्टिलायझर मंत्रालयाने घेतला आहे. तशी करार प्रक्रिया केंद्रीय रेल्वे मंत्रालय व केमिकल, फर्टिलायझर मंत्रालयात पूर्ण झाल्याचे गीते यांनी सांगितले. या करारामुळे अलिबाग तालुका मुंबई, पनवेलशी रेल्वेने जोडला जाणार आहे. या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या