भाजप नेत्याच्या घरी सुरू होती कॉपी; ६२ जणांना अटक

सामना प्रतिनिधी । अलीगढ

एकीकडे उत्तरप्रदेशमधील भाजप सरकार गैरव्यवहार मुक्त परिक्षांचे दावे करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे हे दावे फोल ठरवताना दिसत आहेत. उत्तरप्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यातील एका भाजप नेत्याच्या घरी उत्तरप्रदेश विद्यापीठाच्या परिक्षांचे पेपर लिहीत असताना पोलिसांनी ६२ लोकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तवथू गावात एका भाजप नेत्याच्या आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी सरकारी पथकाने धाड टाकत ६२ लोकांना अटक केली आहे. हे लोक उत्तरप्रदेश विद्यापीठाच्या परिक्षांचे पेपर लिहित असतानाच पोलिसांनी त्यांनी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य व्यवस्थापक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले आहे. बौहरे किशनलाल इंटर महाविद्यालयातच्या व्यवस्थापकांचे घर शाळेच्या समोरच असून त्या घरात महाविद्यालयाचे व्यवस्थापकांचा भाचा आणि भाजप नेता घरात उत्तरप्रदेश विद्यापीठाच्या परिक्षांचे पेपर लिहीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांकडून हे केंद्र रद्द करण्यात येणार असून आरोपीच्या विरोधात कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाचे व्यवस्थापक पेपर लिहिण्याच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून तीन हजार रुपये घेत असत. या प्रकरणी विद्यार्थी गोपाल मिश्रा, प्रदीप कुमार आणि विशाल यांनी तक्रार दाखल केली आहे.