‘आप’ने आघाडीसाठी भीक मागून त्यांचा दुबळेपणा दाखवून दिला! अलका लांबाची स्वपक्षावर टीका

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आपच्या आमदार अलका लांबा या स्वतःच्या पक्षावर नाराज असून त्यांनी आपल्याच पक्षावर जहाल शब्दात टीका करायला सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये काँग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. याबाबत बोलताना लांबा म्हणाल्या की ” ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ हरयाणा इथे काँग्रेससोबत आघाडी करण्याची भीक मागत स्वत:चा दुबळेपणा उघड केला आहे.” लांबा इतेच थांबल्या नाहीत. त्यांनी म्हटले की, जर मला काँग्रेस पुन्हा स्वीकारायला तयार असेल तर मी काँग्रेसमध्ये पुन्हा जायला तयार आहे.

लांबा या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतर्फे दिल्ली विद्यापीठाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 2002 साली त्यांना महिला काँग्रेसचे सरचिटणीस पद देखील बहाल करण्यात आले होते. 2013 साली त्यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवत ‘आप’ मध्ये प्रवेश केला होता. आपतर्फे त्या चांदणी चौक मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या आहेत. भाजपला सत्तेमध्ये येऊ द्यायचे नसेल तर ‘आप’ हाच पर्याय आहे असं मला वाटत होतं, आता जर आपच काँग्रेससोबत आघाडी करण्याचा विचार करत असेल तर माझा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार योग्य असेल असं विधान लांबा यांनी केलं आहे.

आपचे किमान 9 आमदार हे काँग्रेसच्या संपर्कात असून ते लवकरच आप सोडतील, अशी चर्चा दिल्लीमध्ये आहे. यातील अलका लांबा या काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. लांबा यांच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. अलका लांबा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना देण्यात आलेले भारतरत्न परत घेतले जावे असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला लांबा यांनी कडाडून विरोध केला होता. तेव्हापासून केजरीवाल आणि लांबा यांच्यात संघर्ष सुरू आहे.