थायलंडमधील थामलाँग गुहेत अडकलेल्या सर्वांची सुटका

सामना ऑनलाईन। बँकाँक

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत गेल्या सोळा दिवसापासून अडकलेले १२ फुटबॉलपटू व त्यांच्या प्रशिक्षकाला गुहेतून बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. गेल्या तीन दिवसात बचाव पथकाने चार चार मुलांना बाहेर काढले असून सर्व मुलं सुरक्षित बाहेर आल्याने बचाव पथकाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

थायलंडचा संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघ आपल्या प्रशिक्षकासह २६ जून रोजी थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेला होता. यावेळी झालेल्या प्रचंड पाऊस आणि भू-स्खलनामुळे हा संघ गुहेमध्ये अडकला होता. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ संघातील खेळाडूंच्या सायकल, बूट आणि इतर साहित्य सापडल्यामुळे फुटबॉलपटू गुहेतच असल्याचे बचावपथकाला समजले. बचाव पथकाच्या तब्बल नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या संघातील सर्व मुले गुहेत जिवंत असल्यााचे समजले होते. गुहेमध्ये साचलेले पाणी आणि दलदलीमुळे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकापुढे होते. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून १३ विदेशी पाणबुडे व थायलंडच्या नौदलाचे ५ कमांडोजनी शर्थीचे प्रयत्न करत या सर्व मुलांना आणि प्रशिक्षकाला बाहेर काढले आहे.