सोनियांच्या अध्यक्षतेखाली झाली विरोधकांची बैठक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्षपदाच्या जबाबदारीमधून मुक्त झाल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रथमच विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले विषय आणि भाजपविरोधात संसदेत, संसदेबाहेर रस्त्यावर लढा देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट करावी, असे आवाहन सोनिया गांधी यांनी या बैठकीत केले.

राज्यपातळीवरील विषयावरून असलेले मतभेद बाजूला ठेवा आणि भाजपशी राष्ट्रीय पातळीवर मुकाबला करण्यासाठी एकत्र या असे आवाहन सोनियांनी यावेळी केले. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. विरोधी पक्षनेत्यांची ही बैठक पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगमध्ये झाली. घटनेवरील हल्ला, चार न्यायाधीशांनी उघडपणे घेतलेली पत्रकार परिषद, उत्तर प्रदेशातील कासगंज येथील जातीय हिंसाचार आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच धर्माच्या नावाखाली देशात वाढत चाललेल्या हिंसाचाराबद्दल सोनियांनी चिंता व्यक्त केली.