सर्वपक्षीय नगरसेवकांचे धरणे आंदोलन

सामना प्रतिनिधी । येवला

सत्ताधारी भाजपवर येवला नगरपालिकेत नामुष्कीची वेळ आली. स्वपक्षासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्षांकडून विकासकामे होत नसल्याचा आरोप करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका कार्यलयासमोर ठिय्या देऊन धरणे आंदोलन केले.

येवला नगरपालिकेच्या राजे रघुजीबाबा संकुलातील सभागृहामध्ये गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. यावेळी संतप्त नगरसेवकांनी विकासकामे होत नाहीत, नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात असूनही येवल्यासाठी निधी का उपलब्ध होत नाही, नगराध्यक्ष नेमके करतात काय असा सवाल गणेश शिंदे व पुष्पा गायकवाड या भाजपच्या नगरसेवकांनी करत घरचा आहेर दिला. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील रस्ताकामांच्या शासकीय अनुदानाच्या प्रस्तावांचे काय झाले याचेही उत्तर नगराध्यक्ष देऊ शकले नाहीत. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपचे गणेश शिंदे, पुष्पा गायकवाड तर शिवसेनेच्या सरोजिनी वखारे यांनी सभात्याग केला.

सभात्यागानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रवीण बनकर, निसार शेख, प्रा. शीतल शिंदे परवीनबानो शेख, तेहसीन शेख, सबिया मोमीन, रईसाबानो शेख, नीता परदेशी, अपक्ष गटनेते नगरसेवक रूपेश लोणारी, सचिन मोरे, अमजद शेख, अपक्ष नगरसेविका पद्मा शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, शिवसेनेच्या नगरसेवका किरण जावळे यांनी सहभाग घेतला होता.