‘भांडारकर’वर हल्ला, ‘ब्रिगेड’च्या ६८ जणांची मुक्तता

सामना प्रतिनिधी । पुणे

अमेरिकन लेखक जेम्स लेन याने लिहिलेल्या ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या वादग्रस्त पुस्तकाच्या लिखाणात मदत केल्यामुळे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ६८ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. जे. घरत यांनी हा आदेश दिला.

जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या पान व्रंâ. ९३ वर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. जेम्स लेन याने पुस्तकाच्या लिखाणाच्या वेळी त्याला मदत करणा-या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील काही इतिहासकारांची नावे प्रस्तावनेमध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे हा मजकूर भांडारक इन्स्टिट्यूट येथील संशोधकांच्या सांगण्यावरून लिहिल्याचे समजून संभाजी ब्रिगेड संघटनेच्या  कळंब, धाराशीव, गेवराई, बीड, पंढरपूर अशा विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी उजनी धरणाजवळील इंदापूर रेस्ट हाऊस येथे एकत्र येऊन भांडारकर इन्स्टिट्यूट येथे हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानुसार कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटची  ५ जानेवारी २००४ रोजी तोडफोड केली होती. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या ७२ जणांवर दरोडा टाकणे, दंगल घडवून आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव असे आरोप ठेवत खटला दाखल केला होता. मात्र, या ७२ जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. नेमका हल्ला कोणी केला?, तसेच नेमकं नुकसान किती झाले?. कट कोणी रचला? हे आरोप सरकार पक्ष सिद्ध करू शकलेला नाही. त्यामुळे फक्त संस्थेचे नुकसान झाले या कारणामुळे ६८ जणांना शिक्षा देता येणार नाही, असा युक्तीवाद अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ६८ जणांची निर्दोष मुक्तता केली.