महामार्ग चौपदरीकरणातील पुलांची कामे ठप्प, ठेकेदारांनी केले काम बंद

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात १४ पुलांच्या कामांचा शुभारंभ ३ वर्षांपूर्वी करण्यात आला होता़. ही कामे गेली सहा महिने ठप्प आहेत़. अनेक ठिकाणी चौपदरीकरणातील पुल हे अर्धवट स्थितीत उभे आहेत़. कोळंबे येथील पुलाच्या कामाचा श्रीगणेशाही झालेला नाही़. २०१४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला होता़. त्यानंतर पूलाच्या कामांनी वेगही घेतला. मात्र सहा महिन्यापासून पुलांची ही कामे ठप्प झाली आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण १४ पूल उभारण्यात येणार आहेत़. त्यामध्ये जगबुडी नदीवरील पूल, वशिष्ठी नदीवरील पूल, शास्त्री नदीवरील पूल, कोळंबे पूल, सप्तलिंगी नदीवरील पूल, आंजणारी पूल, वाकेड, राजापूर, खारेपाटण, दानवली, बांबर्डे, कसाल, चिपळूण येथील रेल्वे पूल आणि खेड येथील रेल्वेपुलांचा समावेश आहे़. सुरुवातीला पुलांच्या कामाचा वेग पाहता ही कामे लवकर होतील अशी अपेक्षा होती़ मात्र आता या पूलांचे कामच ठप्प झाले आहे. कोळंबे येथील पूलाच्या कामाचा शुभारंभही झालेला नाही. तर राजापूर बायपास किंवा पूल यावर अद्याप निश्चित भूमिका ठरलेली नाही़. त्यामुळे त्या ही पूलाच्या कामाचा शुभारंभ झालेला नाही़. अन्य पूल आजही अर्धवट स्थितीत उभे आहेत़. त्याठिकाणी कामही आता बंद कंरण्यात आले आहे़.

ठप्प पुलांबाबत नितीन गडकरींकडे तक्रार
मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची कामे बंद असल्याची तक्रार शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे़. मुंबई-गोवा चौपदरीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तात्काळ पुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना कराव्यात अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे़.

पुलांची कामे ठेकेदारांमधील गैरव्यवहारांमुळे ठप्प

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामातील पुलांची कामे निधी अभावी ठप्प झालेली नसून ठेकेदारांमधील गैरव्यवहारांमुळे ठप्प झाली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चौदा पुलांपैकी दहा पुलांची कामे ठप्प आहेत.याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी ही कामे निधी अभावी ठप्प नसून ठेकेदारांमधील गैरव्यवहारामुळे ठप्प असल्याचा गौप्यस्फोट केला असून १५ नोव्हेंबर पासून ही कामे पुन्हा सुरू होतील अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली