वाजतगाजत निघाली डेक्कनची क्वीन,महिला चमूकडे सारथ्य

सामना ऑनलाईन, मुंबई

फुलांनी सजवलेल्या लोकल-एक्स्प्रेस, महिला कर्मचारी-प्रवाशांसाठी नवीन सुविधा, महिलांचे सारथ्य असणारी डेक्कन क्वीन, नागपूर-माटुंगा स्थानकाची जबाबदारी महिला चमूवर, मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी, एसी लोकलच्या डब्यांची विशेष रंगरंगोटी, मुंबई-राजधानी एक्स्प्रेसच्या सेकंड एसीमध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीनची सोय, सीएसएमटी येथे रेल्वे बँड, महिला प्रवाशांचे विशेष स्वागत… अशा स्वरूपात मध्य, पश्चिम रेल्वेवर गुरुवार सकाळपासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

मध्य रेल्वेने सीएसएमटी ते पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची सायंकाळी ५.१० ची फेरी विशेष ठरली. त्याचे कारण म्हणजे, या एक्स्प्रेसचे सारथ्य पूर्णतः महिला चमूकडे होते. आशियातील पहिली लोको पायलट सुरेखा भोसले-यादव, सहाय्यक तृष्णा जोशी, गार्ड श्वेता घोणे, टीसी एस. पी. राजहंस, शांती बाला, गीता कुरुप, मेधा पवार, आरपीएफच्या कविता साहू, स्मृती सिंह, ज्योती सिंह, इलेक्ट्रिक तंत्रज्ञ योगिता राणे आदींसह संपूर्ण महिला पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

सीएसएमटी येथून प्लॅटफॉर्म क्र. ९ वरून सुटणाऱया डेक्कन क्वीनचे गुरुवारचे रूप काही न्यारेच होते. फुलांनी सजवलेल्या गाडीत महिला दिनाचे फलकही लागले होते. सायंकाळी ४.४५च्या सुमारास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक संजयकुमार शर्मा आदींसह सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी सुरेखा भोसले-यादव, तृष्णा जोशी, श्वेता घोणे आदी सर्वांना आवर्जून शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठय़ा संख्येने जमलेल्या प्रवाशांनी महिला चमूचे कौतुक करून फोटो, सेल्फीसाठी गर्दी केली होती. गाडी वेळेत सुटण्याची दक्षता घेण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे बँडने बहारदार धून वाजवून शुभेच्छा दिल्या.