शिवसेना–मगोप–गोवा सुरक्षा मंचची गोव्यात महायुती

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्याच्या राजकारणात उलथापालथ करण्यासाठी शिवसेना, मगोप (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) आणि गोवा सुरक्षा मंच यांची ‘महायुती’ झाली असून आज येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत तशी घोषणा करण्यात आली. गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी ३७ जागा महायुती लढवणार आहे. त्यात मगोप २७, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ असा जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील आज जाहीर  करण्यात आला. मगोपचे सुदिन ढवळीकर हे महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर, गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महायुतीचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर, शिवसेनेचे गोवा राज्य संपर्कप्रमुख जीवन कामत आणि शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांची आज पणजीतील हॉटेल मांडवी येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि ‘महायुती’ची घोषणा केली. जागावाटपावरून महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे सुभाष वेलिंगकर यांनी ठामपणे सांगितले.

सुभाष वेलिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीतील घटक पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून किमान समान कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. गोव्यात स्वच्छ आणि पारदर्शक कारभार तसेच माध्यम, प्रश्न मार्गी लावणे यावर नवीन सरकार काम करेल, असे वेलिंगकर यांनी सांगितले. महायुती सत्तेत आल्यावर काँग्रेस सरकारने २०११ मध्ये सुरू केलेले आणि त्यानंतर भाजप सरकारने सुरू ठेवलेले इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान तत्काळ बंद करू, असे आश्वासन यावेळी महायुतीच्या नेत्यांनी दिले.

शिवसेना युतीधर्माचे पालन नेहमीच करत आली आहे आणि करत राहणार. गोव्यातही महायुतीबाबत तेच चित्र आपणास पाहायला मिळेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना साळगाव, थिवी, मुरगाव आणि कुंक्कोळी या चार मतदारसंघांतून लढणार असून गोवा सुरक्षा मंच शिवोली, पणजी, मये, साखळी, कुडचडे आणि वेळ्ळी या सहा मतदारसंघांत लढणार आहे. उर्वरित २७ मतदारसंघांत मगोप आपले उमेदवार उभे करील किंवा अन्य उमेदवारांना पाठिंब्याचा निर्णय घेईल.

निवडणुकीनंतर भाजपशी युती बिलकूल करणार नाही, असे सुभाष वेलिंगकर यांनी ठामपणे सांगितले. निवडणुकीत बहुमत आम्हालाच मिळणार असल्याने तो प्रश्नच उद्भवणार नाही, असेही ते म्हणाले.