नवीन जबाबदारी घेण्यास आलोक वर्मांचा नकार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी अग्निशमन विभागाच्या महासंचालक पदाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. वर्मा यांची एक दिवसापूर्वी सीबीआय संचालक पदावरून हकालपट्टी झाली होती. या पदावरून हटवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुट्टीवर पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. या निर्णयामुळे त्यांना दिलासाही मिळाला होता.

केंद्र सरकारने सीबीआय उपसंचालक नागेश्वर राव यांची संचालकपदी निवड केली आहे. राव यांनी कार्यभार हाती घेताच वर्मा यांनी केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने वर्मा यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर वर्मा यांनी म्हटले की त्यांची बदली त्यांच्या इच्छेविरोधात होत असून एका व्यक्तीने चुकीचे आणि खोटे आरोप केले होते, याच आधारावर त्यांना हटवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने भ्रष्टाचार आणि कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वर्मा यांना आपल्या पदावरून काढले होते.

त्यानंतर केंद्र सरकारने आदेश जारी करत वर्मा यांची अग्निशमन विभाग नागरिक सुरक्षा आणि होम गार्डच्या संचालक महासंचालकपदी नेमणूक केली. परंतु त्यांनी ही नवीन जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला आहे.