‘पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे कार-बाईकवाले भुकेने काही मरणार नाहीत’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेट्रोल-डिझेलचे दर भडकल्यामुळे देशभरातील जनता संतप्त असताना केंद्र सरकार मात्र आगीत तेल ओतत आहे. पेट्रोल-डिझेलची खरेदी कार आणि बाईकवाले करतात आणि दरवाढीमुळे हे लोक काही भुकेने मरणार नाहीत, असे संतापजनक विधान केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी केले आहे.

पेट्रोल-डिझेल कोण खरेदी करते? ज्यांच्याजवळ कार, बाईक आहे ते लोक खरेदी करतात. जे लोक वाहन खरेदी करतात त्यांना पेट्रोल-डिझेल खरेदी करणे परवडते. त्यामुळे भाववाढ झाल्यामुळे हे लोक काही तडफडून मरणार नाहीत, असे तारे अल्फोन्स यांनी तोडले आहेत.

जे लोक वाहन खरेदी करतात त्यांना कर द्यावाच लागेल. सरकार गोरगरीबांच्या भल्यासाठी काम करीत आहे. ग्रामीण भागात घरे, शौचालये उभारली जात आहेत. या योजनांसाठी पैसा लागणार असून करांच्या माध्यमातून पैसा उभा केला जात असल्याचे सांगून अल्फोन्स यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे समर्थन केले.