#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना झापलं


सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि वाद यांचे आता एक अनोखे नाते तयार झाले आहे. याच वादातून हॉलिवूड अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एलिसा मियाने हिने ट्रम्प यांना सोशल मीडियावरून चांगलेच सुनावलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी नामांकित ब्रेट कॅवनॉग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लगावणारी महिला क्रिस्टीन ब्लेसी फोर्ड हिच्या दाव्यावर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एलिसा मियाने ट्विटवरून ट्रम्प यांना झापलं. ‘हे, डोनाल्ड ट्रम्प, ऐका ****. माझ्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाला आहे. एकदा मी किशोरावस्थेत होते तेव्हा अत्याचार झाला होता. मी कधीच याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नाही आणि ही घटना माझ्या आई-वडिलांना सांगण्यासाठी मला 30 वर्ष लागली. लैंगिक अत्याचार झालेली एखादी पीडिता जर आपले म्हणणे मांडू पाहात असेल तर हे ट्वीट त्याला जोडू शकता. #MeToo’, असे ट्वीट एलिसा हिने केले आहे.

विशेष म्हणजे #MeToo या कॅम्पेनद्वारे महिलांच्या समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारी एलिसा ही पहिली महिला आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी ट्वीट करत फोर्ड हिने केलेल्या दाव्यांवर शंका उपस्थित केली होती. ट्रम्प यांना ट्वीटमध्ये म्हटले की, ‘यात काहीच शंका नाही की फोर्डवर ती म्हणते तसा अत्याचार तिच्यावर झाला, परंतु यानंतर तिने किंवा तिच्या आई-वडिलांनी स्थानिक तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केलीच असेल ना. असे असेल तर तिने ती तक्रार दाखल केल्याची प्रत सर्वांसमोर आणावी जेणेकरून सर्वांना कळेल की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तारीख, वेळ आणि ठिकाण काय आहे.’

नक्की काय आहे प्रकरण?
यापूर्वी ब्रेसी फोर्ड हिने वाशिग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, 1980 च्या दशकामध्ये उन्हाळ्यात कॅवनॉग आणि त्यांच्या मित्रांनी दारूच्या नशेत माझे लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेवेळी कॅनवॉगच्या मित्रांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी मला वाटले की हे आता माझी हत्या करतील. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आणि मला नग्नही करण्याचा प्रयत्न केला.