अरण्य वाचन…महादेवाचा डोंगर अंबेचे  शक्तिस्थळ


अनंत सोनवणे,[email protected]

अंबाबरवा वन्यजीव अभयारण्याचे सौंदर्य असे अनोखे आहे की इथे पाऊल टाकताच आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातो… जिथवर नजर जाईल तिथवर डोंगरदऱया आणि गर्द जंगल…

जैवविविधतेने अत्यंत संपन्न असलेले, मात्र तरीही वन्यजीवप्रेमींना फारसे परिचित नसलेले आणखी एक सुंदर अभयारण्य म्हणजे अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य. शेगावपासून जेमतेम ५५ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य वसलेले. बुलढाणा जिह्याच्या उत्तर पूर्वेला सातपुडय़ाच्या कुशीत डोंगरदऱयांनी व्यापलेला हा परिसर आहे. ९ एप्रिल १९९७ रोजी राज्य सरकारने या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. त्यामुळे इथल्या निसर्ग संपदेला कायदेशीर संरक्षण लाभले.

अंबाबरवा वन्यजीव अभयारण्याचे सौंदर्य असे अनोखे आहे की, इथे पाऊल टाकताच आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातो. जिथवर नजर जाईल तिथवर डोंगरदऱया आणि गर्द जंगल! हे जंगल आपल्या पोटात किती जैवविविधता सांभाळत असेल याची नुसती कल्पना करूनच मन थरारून जाते. हे अभयारण्य देशातल्या पहिल्यावहिल्या व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे, एवढीच माहिती अंबाबरवाचे मोठेपण सिद्ध करायला परेशी आहे.

arnya-2

अभयारण्यात मांगेरी इथे एक दुर्गम डोंगर दिसतो. त्याला मांगरी महादेवाचा डोंगर म्हणतात. डोंगरमाथ्यावर विराजमान झालेले महादेवाचे मंदिर हे अंबाबरवाचे शक्तिस्थळ मानले जाते.

अंबाबरवाचे जंगल शुष्क पानगळीचे आहे. साहजिकच उन्हाळय़ात जंगल मोकळेढाकळे असते. पाणवठे आटलेले असतात. त्यामुळे जिथे उपलब्ध असते तिथे पाणी वन्यजीवांसाठी जगण्याची संधीही असते आणि मरणाची भीतीही. अवघ्या जंगलाचा कारभार या उरल्यासुरल्या पाण्याच्या आसपास एकवटला जातो. त्यामुळे अशा स्थळी जंगलातला एखादा दुर्मिळ प्रसंग आपल्या डोळय़ांसमोर घडताना पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभू शकते.

bird-5

पावसाळय़ात अंबाबरवाचे जंगल हिरवेकंच होऊन जाते. डोंगरदऱयांमधून खळाळत पाणी वाहू लागते. वाहत्या नाल्यांमधून खेकडे, बेडूक, पाणनिवळय़ा यांचे अनोखे विश्व उदयाला येते. रानफुलांचे ताटवे बहरतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. अर्थात डोंगराळ भूभागामुळे तो दिसणे तितके सोपे नसते. वाघाव्यतिरिक्त बिबळय़ा, रानमांजरे, रानडुक्करे, उदमांजर, मुंगूस, तीन पट्टय़ांची खर, सांबर, चितळ, काकर, चौशिंगा, अस्वल, वटवाघूळ इत्यादी वन्यजीव इथे पाहायला मिळतात. मार्च ते जून या काळात वन्यजीवांना पाहण्याची संधी अधिक मिळू शकते.

अंबाबरवा अभयारण्याला भेट द्याल तेव्हा आपण वाघाला नव्हे, तर निसर्गाला भेटायला जातोय हे ध्यानात ठेवून मोकळय़ा मनाने जा. फक्त वाघाला शोधत फिराल तर निराशाच पदरी येण्याची शक्यता अधिक. म्हणून इथे निसर्गाचे सौंदर्य टिपायला जा. जे जे दिसेल ते ते डोळे भरून पहा आणि काँक्रिटच्या जंगलात परतण्यापूर्वी मनात एक हिरवे जंगल फुलवून या…

प्रमुख आकर्षण…वाघ

जिल्हाबुलढाणा

राज्यमहाराष्ट्र

क्षेत्रफळ…१२७.११ चौ.कि.मी.

निर्मिती१९९७

जवळचे रेल्वे स्थानकशेगाव (५५ कि.मी.)

जवळचा विमानतळ ः…नागपूर (३२५ कि.मी.)

निवास व्यवस्थावनविभागाचं विश्रामगृह, शेगावमध्ये खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते जून

सुट्टीचा काळ… नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवसनाही