आमदार निवास गेले आणि भाडेही नाही, 50 हजार रुपयांच्या प्रतीक्षेत लोकप्रतिनिधी

majestic-amdar-niwas

सामना विशेष प्रतिनिधी। मुंबई

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी अनेक आमदारांना अजूनही घरभाडय़ाचे पन्नास हजार रुपये भाडे मिळालेले नाही. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दक्षिण मुंबईतील महागडय़ा हॉटेलमध्ये कसा मुक्काम करायचा असा प्रश्न आमदारांना पडला आहे. मॅजेस्टिक आमदार निवासही मागील चार वर्षांपासून रिकामे आहे. त्यामुळे आमदारांच्या निवासाचा प्रश्न जटिल झाला आहे.

मनोरा आमदार निवासाची अतिशय वाईट अवस्था झाल्याने सध्याची इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार निवास धोकादायक झाल्याने खोल्या खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन इमारत बांधण्यास चार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल. आमदाराना घाटकोपरच्या आरटीओच्या जागेवर बांधलेल्या इमारतींत पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता, पण घाटकोपरवरून दक्षिण मुंबईत येणे सोयीचे नाही. त्यामुळे आमदारांनी घाटकोपरच्या खोल्यांना नकार दिला.

मॅजेस्टिकचा प्रश्न प्रलंबितच

मॅजेस्टिक आमदार निवासही मागील चार वर्षांपासून रिकामे आहे. आमदारांनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे आधीच खोल्यांची कमतरता आहे. एका कोर्ट खटल्यामुळे मॅजेस्टिक आमदार निवासाचा पुनर्विकास रखडला आहे.

हॉटेल मालक नडतायत

परिणामी अधिवेशनाच्या काळात आमदारांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एका खोलीसाठी पन्नास हजार रुपये आणि दोन खोल्या असतील तर एक लाख रुपये देण्याचे आश्वासन सरकारने आमदारांना दिले होते. त्यामुळे आमदारांनी खोल्या रिकाम्या केल्या. आमदार निवासस्थानातील उपाहारगृहात सवलतीच्या दरात जेवण व नाश्ता मिळतो. त्याच धर्तीवर दक्षिण मुंबईतील हाँटेलमध्ये सवलतीच्या दरात जेवण देण्यासाठी चाचपणी केली पण सध्याच्या महागाईमुळे हॉटेल मालकांनी बिलात एका पैशाचीही सूट देण्यास नकार दिला.

सगळीच बोंबाबोंब

सध्या अनेक आमदारांना खोल्या मिळाल्या नाहीत आणि आश्वासन दिल्याप्रमाणे भाडेही मिळाले नाही अशी खंत सर्वच पक्षांच्या आमदारांनी बोलून दाखवली. राज्याच्या ग्रामीण भागातून या अधिवेशासाठी आमदार व कार्यकर्ते मुंबईत आले आहेत पण जागा नसल्याने खूप अडचण निर्माण झाली आहे. आमदारांच्या म्हणण्यानुसार दक्षिण मुंबईतील हॉटेलचे दर परवडणारे नाहीत. एकीकडे वास्तव्याला खोली नाही आणि दुसरीकडे खोलीचे भाडेही मिळत नाही. आमदारांच्या निवासस्थानाचे भाडे अदा करण्यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांची तरतूद केली पण तरीही भाडे अदा होत नाही. त्यामुळे काही आमदारांनी पुन्हा मनोरा आमदार निवासातील खोल्यांचा ताबा घेतला याकडे काही आमदारांनी लक्ष वेधले. एका आमदाराने मनोरा आमदार निवासातील खोली रिकामी केली पण सरकारने अजून भाडेही दिलेले नाही. त्यामुळे जवळच्या परिचित मंत्र्यांच्या बंगल्यातील खोलीचा ताबा घेऊन बस्तान बसवले आहे. एका आमदाराने दक्षिण मुंबईतील सोसायटीत घर भाडय़ाने घेतले होते पण आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या वर्दळीमुळे सोसायटीने आक्षेप घेतला. अखेर सोसायटीतील घर रिकामे करावे लागले.