पाकिस्तानला अमेरिकेचा आणखी एक झटका; मोठी आर्थिक मदत रद्द

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणे पाकिस्तानने अजूनही थांबवलेले नाही. तसेच दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची ( सुमारे 2130 कोटी) आर्थिक मदत रद्द केली आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर १५ दिवसातच अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला हा दुसरा धक्का आहे. या आधाही अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी 500 मिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द केली होती.

अमेरिकेकडून पाकिस्तानला ही आर्थिक मदत कोएलिशन सपोर्ट फंडसाठी देण्यात येणार होती. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारले होते. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अफगाणिस्तानमध्ये लढत आहोत आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. अमेरिकेची अशी फसवणूक सहन करणार नाही, असे बजावत त्यांनी पाकिस्तानची आर्थिक मदत रद्द केली होती. अजूनही पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली असती आणि त्यांची आश्रयस्थाने नष्ट केली असती तर अमेरिकेने त्यांनी 300 मिलियन डॉलरची मदत नक्कीच केली असती. मात्र, दहशतवादाविरोधात लढण्याची पाकिस्तानची मानसिकता नाही. तसेच ते याबाबत सकारात्मक नाहीत. पाकिस्तानला मदत केल्यास तो पैसा दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही मदत रद्द करण्यात येत असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांनी सांगितले.

अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात मोहीम राबवत आहे. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देत असल्याने अमेरिकेला मोहीमेत अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने त्यांची आर्थिक रसद बंद केली आहे. अमेरिकेचे परदेशमंत्री माइक पॉम्पिओ आणि लष्करी अधिकारी जोसेफ डनफोर्ड सप्टेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी ही मदत रद्द करून पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात दहशतवादाविरोधात कारवाई हा एकमेव चर्चेचा विषय असेल असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

‘पाकिस्तान हे अमेरिकेच्या हातातील बाहुले नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आणि क्षमतेने दहशतवादानिरोधात लढत आहोत. अमेरिकेच्या तालावर आम्ही नाचणार नाही. अमेरिकेने आर्थिक मदत थांबवल्याने अडचणी येतील. चीन किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक पॅकेज मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांचा फायदा होईल असे संबंध आम्हाला अमेरिकेशी हवे आहेत’, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, वॉशिंग्टन सध्या स्वतःचाच फायदा बघत आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानमधून अफगाणीस्तान करण्यात येणारे ड्रोन हल्ले थांबवावेत असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या आर्थिक मदतीसाठी आम्ही आमची स्वायतत्ता आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.