नोटाबंदीमागे अमेरिकेचा हात

सामना ऑनलाईन। बर्लिन

हिंदुस्थानातील नोटाबंदी हा तेथील सरकारचा निर्णय नाही तर यामागे अमेरिकेचा हात आहे असा खळबळजनक दावा जर्मनीचे नामवंत अर्थतज्ञ नॉर्बर्ट हॅरिंग यांनी केला आहे. चीनला शह देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सरकारने हिंदुस्थानात डिजिटल व्यवहार वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला. यासंदर्भात हिंदुस्थानच्या अर्थमंत्रालयाबरोबर वाटाघाटीही केल्या असेही हॅरिंग यांनी म्हटले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. यानंतर बँकेतून पैसे काढण्यावर आणि भरण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. नोटाबंदीमुळे गोरगरिबांचे प्रचंड हाल झाले आहेत. ही परिस्थिती जानेवारी २०१७ उजाडलं तरी सुधारलेली नाही. परिस्थिती पूर्वपदावर यायला मार्च महिना उजाडेल असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी, दहशतवाद, नक्षलवादाचं कंबरडं मोडायचं आहे असं सांगत नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतर देशभरात सापडलेल्या कोट्यवधी रूपयांच्या नव्या नोटांमुळे या निर्णयावर मोठं प्रश्न निर्माण झालंय. सामान्य जनतेला बँकेतून अवघ्या काही नोटा मिळत असताना बाहेर मात्र घोटाळेबाज नव्या नोटांची बंडलं घेऊन फिरत होते, कमिशन घेऊन त्या लोकांना बदलून देत होते. यामध्ये बँकांचे अधिकारी,कर्मचारी देखील सामील होते.