Pulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांचे मत प्रदर्शित केले आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तामधील संबंध अतिशय ताणले गेलेले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की या दोन देशातील परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली आहे. अमेरिकेतील प्रशासन दोन्ही देशांच्या संपर्कात असून ही परिस्थिती निवळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले.

ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की ‘हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड बिघडलेले आहेत. एक अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती निवळताना आम्हाला बघायचे आहे. बरीचशी लोकं मारली गेली आहेत. आम्हाला असं वाटतं हे ताबडतोब थांबायला हवं. आम्ही या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. ‘

ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर हिंदुस्थान अत्यंत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. ‘हिंदुस्थानने या हल्ल्यामध्ये त्यांचे जवळपास 50 जवान गमावले आहेत, त्यामुळे मी त्यांची भूमिका समजू शकतो. या हल्ल्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत.’ असं ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.