अमेरिकेचा पाकला पुन्हा दणका!२५५ दक्षलक्ष डॉलर्सची लष्करी मदत रोखली

सामना ऑनलाईन,वॉशिंग्टन

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या खोटारडेपणावर हल्ला चढवल्यानंतर २४ तासांच्या आतच अमेरिकेच्या प्रशासनाने पाकला आणखी मोठा दणका दिलाय. अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत रोखण्यात आल्याचे ‘व्हाइट हाऊस’ने आज जाहीर केले.

अमेरिकेने गेल्या १५ वर्षांहून अधिक कालावधीत पाकिस्तानला मूर्खपणाने ३३ अब्ज डॉलर्सहून अधिक मदत दिली आहे. परंतु आमच्या नेत्यांना मूर्ख समजत पाकिस्तानने या मदतीच्या बदल्यात केवळ असत्य आणि फसवणूकच केली आहे, असे ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पाकिस्तानचा समाचार घेतला होता.

या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला २५५ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाही. पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवादाविरोधात धडक आणि निर्णायक कारवाई करावी, असे राष्ट्राध्यक्षांनी नमूद केले आहे. त्यावर पाकने सकारात्मक पावले उचलल्यास लष्करी मदतीबाबत विचार केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने वृत्तसंस्थेला सांगितले.

पाकिस्तानची मुजोरी कायम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र आम्हाला अमेरिकेच्या मदतीची गरज नाही, आम्ही अमेरिकेची हुकूमशाही सहन करणार नाही, असे सांगत पाकिस्तानने मुजोरी कायम ठेवली आहे. अफगाणिस्तानमधील युद्धासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानच्या साधनांचा वापर केला जातो. त्याचीच किंमत ते मोजत आहेत असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी सांगितले. ट्रम्प यांचे ‘नो मोअर’ काहीही महत्त्व नाही. पाकिस्तान अमेरिकेची हुकूमशाही सहन करणार नाही असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल रात्री अमेरिकेचे राजदूत डेविड हेली यांना बोलावून ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत तीक्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानने धोका दिल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्याचे स्पष्टीकरण हेली यांच्याकडे मागण्यात आले आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने हेली यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बोलावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.