अमेठीसकट प्रियंकांनी जिथे प्रचार केला तिथे काँग्रेस हरली, वाचा सविस्तर बातमी

85

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षामध्ये महत्वाचे स्थान दिले आणि उत्तर प्रदेशमधील पूर्वेकडच्या सारख्या भागाची जबाबदारी दिली. प्रियंका यांनी स्वत:ला निवडणुकीच्या प्रचारात झोकून दिले होते. मात्र काँग्रेससाठी चिंताजनक बाब ही आहे की त्यांनी जिथे-जिथे जाऊन काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार केला त्या सगळ्या मतदारसंघात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. गांधी कुंटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये स्वत: राहुल गांधीही पराभूत झाले. त्यांच्यासाठीही प्रियंका गांधींनी अमेठीत दिवसरात्र एक करत प्रचार केला होता.

प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांच्यासाठी रायबरेली आणि राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड इथे प्रचार केला होता. या दोन जागा मात्र काँग्रेसने जिंकल्या आहेत. काँग्रेसचा पडता काळ सुरू झाला तेव्हा देखील त्यांना साथ देणाऱ्या पंजाबमध्ये प्रियंका जिथे प्रचारासाठी गेल्या तिथेही काँग्रेस हरली. प्रियंका यांनी बठींडा आणि गुरुदासपूर इथे प्रचार केला होता.

उत्तर प्रदेशाशिवाय प्रियंका गांधी यांनी देशभरात 12 लोकसभा मतदारसंघात प्रचार केला होता. यातील 11 लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. प्रियंका गांधी यांच्यामुळे नव्या जागांवर काँग्रेसला विजय मिळेल अशी आशा राहुल गांधींना वाटत होती, मात्र नव्या जागा दूर राहील्या आहे त्याही जागा काँग्रेसने गमावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या