‘आम्ही दोघी’ हा नातेसंबंधांवरचा चित्रपट- प्रतिमा जोशी

सामना ऑनलाईन । मुंबई

गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित समराठी चित्रपट ‘आम्ही दोघी’ येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. प्रतिमा जोशी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. मुक्ता आणि प्रिया या दोघीही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दोघींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्याबरोबर किरण करमरकर, भूषण प्रधान, आरती वडगबाळकर आणि प्रसाद बर्वे यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेली आहे. ‘आम्ही दोघी’ चित्रपटाची माहिती देण्यासाठी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्रिया बापट, भूषण प्रधान, आरती वडगबालकर, किरण करमरकर, प्रसाद बर्वे, दिग्दर्शिका प्रतिमा जोशी, पटकथा व संवाद लेखिका भाग्यश्री जाधव आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया उपस्थित होते.

चित्रपटाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई या दोन प्रमुख पात्रांभोवती बेतलेली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. विचारसरणी वेगळ्या असल्या तरी महिला इतर बाबतीत एकसारख्या असतात. त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्या मार्ग वेगवेगळे चोखाळतात. मुक्ता बर्वे सकारात असलेली व्यक्तिरेखा ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका गृहिणीची आहे. तिला शहरी भागाच्या जीवनशैलीचा तसा गंध नाही. प्रिया बापट ही एक थोडी वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारते आहे. त्यातून जीवनाचे तीन टप्पे अधोरेखित होतात.

‘जे मनात येईल ते पटकन करून मोकळे व्हा, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल,’ हे आहे सावित्रीच्या जीवनातील तत्वज्ञान. ती स्वतःच्या आयुष्यात या तत्वज्ञानाचे तंतोतंत पालन करते. आपल्या भूमिकेविषयी सांगताना प्रिया म्हणाली की, सावित्री ही व्यक्तिरेखा मी आजवर साकारलेल्या अनेक भूमिकांपेक्षा वेगळी आहे. ती खूप खरी आहे. जे मनात येईल ते करून मोकळी होते, पण निर्णय घेतल्यानंतर ते निभावून नेण्याचा प्रामाणिकपणाही दाखवते. त्यामुळे मला सावित्रीचं पात्र जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाच ती मला मनापासून आवडली होती.’ असं प्रिया म्हणाली.

या चित्रपटातलं दुसरं महत्त्वाचं पात्र म्हणजे अमला. चित्रपटात तिला सगळे अम्मी म्हणतात. ही भूमिका चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने साकारली आहे. मुक्ताने तिच्या भूमिकेविषयीचं तिचं मत व्यक्त केलं. मुक्ता म्हणाली की, अम्मी खूप शांत आहे. पण, ती विचारच करत नाही, असं मात्र नाही. ती वयाने लहान आहे. पण परिस्थितीने मात्र तिला शहाणं केलं आहे. त्यामुळे ती फारशी बोलत नसली तरी योग्य वेळी योग्य ते मत व्यक्त करायला ती अजिबात कचरत नाही.’ असं मनोगत मुक्ता बर्वे हिने व्यक्त केलं आहे.

amhi-doghi-1

प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. ”आम्ही दोघी’ हा चित्रपट प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. गौरी देशपांडे या काळाच्या पुढे चालणाऱ्या प्रागतिक लेखिका होत्या. त्यांच्या कादंबरी, लघुकथा आणि कविता खूपच गाजल्या त्या त्यातील संकल्पनाच्या ऊंचींसाठी. त्यांनी स्वतःच्या शैलीतून साहित्यिक जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले,” असे उद्गार चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांनी काढले आहेत.

”आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची आणि म्हणूनच त्यांना प्रिय असलेली गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. हा विषय प्रत्येक तरुणीशी भावनात्मकरित्या जोडला जाणारा आहे, म्हणूनच प्रेक्षक त्याबाबत संवेदनशीलरित्या जोडला जाईल. गौरी देशपांडे यांच्या लिखाणावर बेतलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते, असेही त्यांनी म्हटले आहे. ”मी फार पूर्वीच ठरविले होते की जेव्हा केव्हा मी स्वतः चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा तो गौरी देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित असेल,” असं मनोगत प्रतिमा जोशी यांनी व्यक्त केलं.

”या चित्रपटाचं नाव आम्ही दोघी असं असलं तरी या नात्यांच्या चष्म्याने आपण आपली कोणतीही नाती पाहू शकतो. ही गोष्ट जरी दोघींची असली तरीही हा काही स्त्रीप्रधान चित्रपट नाही. इथे दोन पुरुषांची, दोन मित्रांची किंवा दोन भावांची गोष्ट असती, तरीही यात नातेसंबंधांवर केलेल्या भाष्यात ती अगदी फिट बसली असती. इतका हा चित्रपट नात्यांशी जोडलेला आहे”, असं मत अभिनेता भूषण प्रधान याने व्यक्त केलं आहे. या चित्रपटात सावित्रीच्या मैत्रिणीची भूमिका करणाऱ्या आरती वडगबाळकर हिनेही तिचं पात्र उलगडून सांगितलं. ”मी यात सावित्रीच्या मैत्रिणीचं नेहाचं पात्र साकारतेय. नेहा ही सावित्रीसारखी स्वयंप्रेरित नाही. पण तिच्या वाटेला जे आलंय त्याबद्दल तिची काही तक्रारही नाही. म्हणूनच तिने सावित्रीला तिची मैत्रीण म्हणून स्वीकारलं आहे. मी आजपर्यंत अशी भूमिका कधीच केली नव्हती”, असं आरती वडगबाळकर हिने सांगितलं.

‘आम्ही दोघी’ची निर्मिती आणि सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया यांचे आहे. ”मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.