आम्ही खवय्ये – हॉट चॉकलेट… केळावेफर्स… आणि चहा!

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – मी खाण्यासाठी जगते, जगण्यासाठी खात नाही. खाणं माझं प्रेम आहे. जेवायला बसल्यावर पटपट जेवले असं होत नाही. जेवताना नेहमीच खूश असते.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – घरी जेवायचंय या विचारानेच मी खूश असते. शेपूव्यतिरिक्त सर्वच खायला आवडतं. वहिनीने केलेली पेस्ट्री, आईच्या हातचं भरलं वागं खूपच आवडतं.

खायला काय आवडतं? – केळ्याचे वेफर्स खूप आवडतात. ते मी रोज खाते. जेवणासोबतही आवडतात. घरची पुरणपोळीही आवडते. आई आणि वहिनी सुगरण असल्याने मला स्वयंपाक करण्याचा वारसा हक्काने मिळालाय असं मला वाटतं. मला नवनवे पदार्थ बनवायला आवडतात. मी एगटेरियन आहे. मासे खात नाही, पण खूप छान करते.

प्रयोगावेळी खाणं-पिणं कसं सांभाळता? – घरगुती खाणावळीत जेवते. ती सोय नसेल तर तिथला प्रसिद्ध पदार्थ खाते. माझ्या ठरलेल्या वेळा आहेत त्याप्रमाणे खातेच. बॅगेत कायम सुका मेवा, बिस्किटे, वेफर्स, फळं, रेडी टू मेक चहा असतो. लंडन फिरण्यासाठी गेले होते. तिथलं हॉट चॉकलेट आवडलं. ही मझ्यासाठी यादगार गोष्ट आहे.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – ठराविक कोणतंही नाही, मी खूप चहाप्रेमी असल्यामुळे चहाची माझी काही ठिकाणं आहेत. गिरनारचा लेमन टी मला आवडतो. पुण्यातला ‘चाय कट्टा’मधला नवाबी चहा माझा फेव्हरेट आहे.

डाएट करता? – अधूनमधून करते, पण त्यामध्ये विशेष पथ्य न पाळता व्यायामावर भर देते.

फिटनेसची काळजी कशी घेता? – आवडता पदार्थ खूप खाल्ला असं करत नाही.

स्ट्रीट फूड आवडतं का? – प्रचंड आवडतं. मला तर वाटतं, चव तिथेच असते. पाणीपुरी, दाबेली आवडते.

वरईची खीर
सर्वप्रथम वरई भाजून घ्यायची. खीर करायच्या वेळी ती साजूक तुपात पुन्हा भाजायची. त्यात थोडं पाणी घालून शिजवून घ्यायची. ती पटकन शिजते. आवडत असल्यास त्यात आटवलेलं दूध घालावं. नाही तर नेहमीप्रमाणे गरम केलेलं दूध घालावं. एका बाजूला दुधात साखर आणि केशर घालून ठेवावं. वरई थोडी शिजली की, त्यात ते दूध ओतावं आणि भरपूर सुका मेवा घालून खीर ढवळावी. ओलं खोबरं घातलं तरीही चालेल. वरून वेलचीपूड घालावी. छान उकळी येऊ द्यायची. आदल्या दिवशी करून ठेवली आणि दुसऱया दिवशी खाल्ली तर अतिशय सुंदर चव आलेली असते. खवा घालून केली तरीही चालते.