कृष्णा-मराठवाडा प्रकल्प केंद्रिय प्रकल्प म्हणून जाहीर करावा; आमदार अमित देशमुख यांची मागणी

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्‍या 63 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग बांधणी तसेच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एमएसआरडीसीऐवजी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे देण्यात यावी. तसेच कृष्णा खोऱ्यातून मराठवाडयात आणणाऱ्या 25 टीएमसी पाण्याचा प्रकल्प केद्रिंय प्रकल्प म्हणून जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव आमदार अमित देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची आमदार अमित देशमुख यांनी भेट घेतली. सध्या लातूरसह मराठवाड्यातील महामार्ग बांधणी तथा दुरुस्तीची कामे सूरू आहेत. ही कामे जदलगतीने तसेच दर्जेदार व्हावीत अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. रस्त्याची रुंदी वाढवत असताना जमिन अधीग्रहणासह अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावतो आहे. मात्र गडकरी यांनी यात लक्ष घातल्यास कामाचा वेग वाढेल तसेच कामेही दर्जेदार होतील अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. कृष्णा खोऱ्यातून मराठवाडयात आणणाऱ्या 25 टीएमसी पाण्याचा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. हा प्रकल्प केद्रिंय प्रकल्प म्हणून जाहीर करावा जेणेकरून निधी उपलब्ध होवून हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल यातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा मिळेल अशीही मागणी करण्यात आली. बार्शी-येडशी-मुरुड-लातूर-रेणापूरफाटा-अष्टामोड-उदगीर-देगलूर-अहमदपूरफाटा- खतगाव- सगरूळी- कारला फाटा हा 63 क्रमांकाचा विशाखापट्टनम-सिरोंचा-मुंबई जोडणारा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर उद्गीर-लातूर-टेंभूर्णी-पूणे-मुंबई दरम्यान दररोज मोठी वाहतूक असते. या महामार्गाचा डीपीआर बनवण्यासाठी एमएसआरडीसीकडे जबाबदारी आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची देखभाल दुरुस्ती मुख्यअभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत होत आहे. लातूर- धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाची रुंदी फारच कमी आहे. या अरूंद महामार्गावरून अवजड वाहणे जातात परीणामी सर्वत्र खड्डे निर्माण झाले आहेत. अनेक दिवसापासून येथील रुंदीकरण व देखभालीचे काम रखडले आहे.

एमएसआरडीसीकडे या भागातील लातूर – निटुर – निलंगा – औराद शहाजनी – भालकी रोड – राज्य महामार्ग क्र. 752 के तसेच अहमदपूर – अंबाजोगाई – केज – मांजरसुंबा राज्य महामार्ग क्र. 548 डी हे राष्ट्रीय महामार्गांची ईपीसी अंतर्गत कामे सूरु आहेत. परंतु त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने विषयांकीत राष्ट्रीय महामार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे कार्यकारी अभियंत्याचे एक विभागीय कार्यालय, लातूर यथे असून त्यांच्याकडे देखरेख – देखभाल दुरुस्तीसाठी हा महामार्ग आहे. एमएसआरडीसीकडे सद्यस्थितीत प्रचंड कार्यभार व अपुरी तांत्रिक यंत्रणा पहाता हा महामार्ग मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूर यांच्याकडे वर्ग झाल्यास तत्परतेने महामार्गाची ईपीसी अंतर्गत कामे मार्गी लागतील आणि या महत्वपूर्ण रस्त्याच्या विकासाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.