मोबाईल गेम्सपासून सावध राहा!


>>अमित घोडेकर<<

मोबाईल गेम्स. आजच्या काळातील आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग. पण जेव्हा हे खेळ जीवघेणे होतात तेव्हा

तासन्तास मोबाईल्स, इंटरनेटवर असणाऱया तरुणाईने आता थोडे सावधान व्हा… ब्ल्यू व्हेल गेमच्या दहशतीनंतर आता मोमो गेम जीवघेणा ठरतोय. या गेमने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. कधी व्हॉट्सऍपच्या लिंकवर तर कधी फेसबुकच्या लिंकवर… एवढेच नाही तर मोबाईलवर फोन करून सावज शोधले जात आहेत. त्यामुळे पालकांनो सतर्क व्हा… मुलांकडे लक्ष द्या… अशी कुठलीही लिंक ओपन करू नका.

गेल्या वर्षी हिंदुस्थानात ब्ल्यू व्हेल या भयानक खेळात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. ब्ल्यू व्हेलची दहशत कमी होते न होते तोच आता मोमो चॅलेंज खेळ व्हायरल झाला आहे. हा खेळ नेमका कुठल्या प्रकारच्या लिंकवरून किंवा कशावरून येतोय ते कळलेले नाहीय. या खेळाचा सोर्स आहे वेगवेगळ्या प्रकारचा आहे. एक तर व्हॉट्सऍपवरून मेसेज येतात आणि आव्हान करतायत. कधीकधी फोनही येतात. ‘तुम्ही हा खेळ खेळा’ असे सांगणाऱया मेसेजमध्ये लिंक देण्यात येतात. काही लोकांचे फोन हॅक केले जात आहेत. त्यांच्या फोनवर हा गेम डायरेक्ट इंस्टॉल होतोय. त्यामुळे हा गेम आहे वेगवेगळ्या प्रकारे पसरतोय. त्यात धोकादायक बाब अशी की ज्या लहान मुलांच्या हातात मोबाईल आहे, पालकांना माहीत नसतं मुलं मोबाईलवर नेमके काय करतात, त्यांच्यासाठी ही खूप धोकादायक गोष्ट आहे. कारण एखाद्या मुलाकडे मोबाईल आहे आणि त्या मुलाला एकादा कॉल आला ‘हा गेम तू खेळ आणि व्हॉट्सऍपवर एखादी लिंक आली किंवा त्याचा फोन हॅक झाला आणि ऑटोमॅटिक त्यात गेम इंस्टॉल झाला तर मुलं कदाचित नकळत तो खेळ खेळू शकतात आणि अशा खेळांना बळी पडू शकतात.

एकदा का ‘मोमो’ गेममधील चॅलेंज स्वीकारलंत की माणूस त्यात गुंतत जातो आणि शेवटी त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासही भाग पाडतो. या खेळामध्ये ब्ल्यू व्हेलप्रमाणेच वेगवेगळे टास्क दिले जातात. टास्क पूर्ण केले की त्यांना धमकी द्यायची नाहीतर आत्महत्या करा. हा खेळ खरं तर दुसऱयाला ब्लॅकमेल करण्याचा आहे. त्यासाठी लहान मुलांना टार्गेट केले जात आहे. आधीच मोबाईल हॅक केल्यामुळे ते कळणं खूप अवघड असतं.

नेमके चॅलेंज काय?

सर्वप्रथम मुलांना व्हॉट्सऍपवर अज्ञात नंबरवरून संदेश येतो. या मेसेजमध्ये त्यांना मोमो नाव सेव्ह करण्याची विनंती येते. नंबर सेव्ह केल्यानंतर भयानक फोटो दिसतो. नंतर टास्क पूर्ण न केल्यास धमकी दिली जाते. मग घाबरून युजर आत्महत्येस प्रवृत्त होतो.

काय काळजी घ्याल?

> पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवे.

> मुलांच्या मोबाईलवर विचित्र गेम असतील तर ते डिलीट करून टाकावेत.

> मोबाईलमध्ये पॅरेंटेथिकल कंट्रोल सॉफ्टवेअर असतात. त्यामुळे मुलं पालकांच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट करू शकत नाहीत.

> मुलांनी ती गोष्ट केली तर त्याचे नोटीफिकेशन लगेच पालकांना पाठवली जाते. अशी ऍप्स टाकण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

> मुलांना ज्यावेळी मोबाईल देता, त्यावेळी मोबाईलचे लोकेशन सर्व्हिस बंद ठेवा. समजा तुमचे लोकेशन ट्रक करून मुलांवर कोणी पाळत ठेवत असेल तर ते बंद होईल.