दंगलीच्यावेळी माया कोडनानी विधानसभेत होत्या- अमित शहा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमधील नरोडा पाटिया दंगल प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साक्ष विशेष सत्र न्यायालयात नोंदवण्यात आली आहे. दंगल झाली त्यावेळी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी नरोडा गावात नव्हत्या, तर त्या गुजरात विधानसभेत होत्या. तसेच कोडनानी यांची आणि माझी विधानसभेत भेट झाली होती, अशी साक्ष अमित शहा यांनी कोर्टात दिली. अमित शहा यांनी दिलेल्या या साक्षीमुळे कोडनानी यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

माया कोडनानी यांचा दंगल घडवण्यात हात होता, असा ठपका कोर्टाने याआधी ठेवला आहे. माया कोडनानी त्यावेळी गुजरातच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीत ९७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

कोडनानी यांनी या प्रकरणी अमित शहा आपल्या बाजूने साक्ष देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे साक्षीदार म्हणून अमित शहा यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स कोर्टाने बजावले होते. त्यानंतर अमित शहा यांनी आज(सोमवारी) कोर्टात हजर राहून कोडनानी यांच्या बाजूने साक्ष दिली.

या प्रकरणी कोर्टानं याआधीच कोडनानी यांना २८ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र आजारपणामुळे त्या जामिनावर बाहेर आहेत.