अमित शहा डिसेंबरपर्यंत भाजपच्या अध्यक्षपदी राहण्याची शक्यता

66

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपच्या अध्यक्षपदी डिसेंबरपर्यंत अमित शहाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत पक्षातंगर्त निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तोपर्यंत शहा यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद राहील अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका शहा यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहेत. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यातील पक्ष प्रमुखांसह वरिष्ठ नेत्यांची बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीत पक्षातंर्गत निवडणुका, सदस्य नोंदणी अभियान आणि संघटनेबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत पक्षातील विविध रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही फेरनियुक्तांबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच केंद्रीय गृहमंत्रीपदी असलेले शहा पक्षाच्या अध्यपदाचाही कार्यभार पाहणार का, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत डिसेंबरपर्यंत पक्षातंर्गत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तोपर्यंत अमित शहा यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद राहील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पक्षासाठी महत्त्वाच्या असल्याने शहा यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली. जम्मू कश्मीरमधील राष्ट्रपती राजवट हटवून तेथेही विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अजून काही महिने पक्षाचे अध्यक्षपद शहा यांच्याकडेच राहणार आहे. अमित शहा शुक्रवारी विविध राज्याचील पक्षाच्या महासचिवांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी राज्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणुकासाठी पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. पक्षाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला शिवराज सिंह चौहान, रमणसिंह, वसुंधरा राजे, महासचिव कैलाश विजयवर्गीय, भूपेंद्र यादव, जे.पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे राज्यातील प्रमुख आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र, डिसेंबरपर्यंत शहाच पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जे.पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची नावे आघाडीवर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या