बिग बींचा केबीसी लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप?

सामना ऑनलाईन । मुंबई

देवीयों और सज्जनों म्हणत ऑगस्ट महिन्यापासून अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘कौन बनेगा करोडपती ९’ शोचे सूचसंचालन ते करताहेत. या शोला प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती लाभली आहे. केबीसीच्या यंदाच्या सिझनमध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले. याचाही फायदा शोला चांगलाच झाला. सर्वसामान्य स्पर्धकांसोबत दर आठवड्याला रिअल लाइफ हिरो शोमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे टीआरपीमध्येही हा शो चांगलाच गाजत आहे.

आतापर्यंत हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचे खेळाडू हरमनप्रीत कौर, मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच पी.व्ही.सिंधू, ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनासुद्धा शोमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र आता बिग बींच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक वाईट बातमी आहे. ‘केबीसी ९’ हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळते आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार केबीसीचा शेवटचा भाग २३ ऑक्टोबरला टेलिकास्ट होणार आहे.

२३ ऑक्टोबरनंतर सोनी टीव्हीवरील रात्री ९ ते १०.३० चा स्लॉट नव्या मालिकांना देण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार सोनीची सर्वात वादग्रस्त ठरलेली ‘पहरेदार पिया की’चा नवा सिक्वल, जायेद खानची नवीन मालिका ‘हासिल’ आणि आणि आगामी मालिका ‘एक दिवाना था’ या तीन मालिका केबीसीच्या जागी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.