नाशिकचे धडाकेबाज सहाय्यक जिल्हाधिकारी बीडमध्ये, कर्मचाऱ्यांची घबराट

सामना प्रतिनिधी । बीड

नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आयटीडीपीचे प्रकल्प संचालक अमोल येडगे यांची बीडच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर कामाचा धडाका सुरू केला. बुधवारी पहाटे राजुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आश्चर्यकारक भेट देऊन पहाणी केली. अमोल येडगेंच्या धडाकेबाज कामामुळे घोटाळेबाज कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बीडचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार धनराज नीला या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दिला होता. शनिवारी शासनाने अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आणि यामध्ये नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आयटीडिपीचे प्रकल्प संचालक अमोल येडगे यांची बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी आपल्या पदाचा पदभारही घेतला.

अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून जळगावमध्ये त्यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. सध्या ते नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवारी पहाटे बीडच्या आव्हान स्वीकारत राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. तेथील कारभार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहाणी केली. त्यांच्या या धडाकेबाज कामामुळे बीड जिल्हा परिषदेतील कुचकामी आणि घोटाळेबाज कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.