अमूल दूध महागले, उद्यापासून खिसा होणार हलका

201

सामना ऑनलाईन । मुंबई

अमूलच्या दूध किंमतीमध्ये प्रति लिटर दोन रुपयांची दर वाढ करण्यात आली आहे. गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) संचालक आर. एस सोढी यांनी ही माहिती दिली आहे. दुष्काळ आणि उन्हाचा कहर सोसत असणाऱ्या देशवासियांना यामुळे आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे.

अमूल दुधाच्या किंमतीमध्ये करण्यात आलेली दरवाढीची अंमलबजावणी उद्यापासून अर्थात 21 मे पासून होणार आहे. त्यामुळे उद्यापासून अमूल दूध घ्यायला जाताना अधिकचे पैसे न्यायाला विसरू नका. याचा थेट प्रभाव घरखर्चाच्या वाढीमध्ये होणार आहे.

म्हणून किंमतीत वाढ
दुष्काळामुळे जनावरांसाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे खर्चातही वाढ झाली आहे, तसेच शेतकऱ्यांनी जनावरांना कमी चारा खावू घालणे सुरू ठेवल्याने दुधाचे उत्पादनही कमी होऊ लागले. दुधाचे उत्पादन कमी झाल्याने व चाऱ्याच्या खर्चात वाढ झाल्याने किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे अमूल दूध विकणारी कंपनी गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) संचालक आर. एस सोढी यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी अमूल डेअरीने दुधाचे खरेदीमुल्य वाढवले होते. अमूलने म्हशीच्या दुधातील एक किलो फॅटमागे 10 रुपये आणि गाईच्या 1 किलो फॅटमागे साडे चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूध खरेदीमुल्यात वाढ झाल्याने लाखो पशूधारकांना फायदा मिळणार आहे, असे कंपनीने म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या