सहाय्यक प्राध्यापकाचा अपमान केल्याने विभागप्रमुखावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

सामना प्रतिनिधी, मुंबई

टीवायचे निकाल रखडल्यामुळे सुरू असलेली बदनामी नुकतीच थांबली असताना आता मुंबई विद्यापीठावर आणखी एक नामुष्की ओढवली आहे. सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुंदर राजदीप यांचा अश्लील भाषेत अपमान केल्याने विभागप्रमुख डॉ. संजय रानडे आणि सहाय्यक प्राध्यापिका दैवता पाटील यांच्यावर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या पत्रकारिता व संज्ञापन विभागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील पत्रकारिता व संज्ञापन विभागात डॉ. सुंदर राजदीप हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. या विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय रानडे आणि सहाय्यक प्राध्यापिका डॉ. दैवता पाटील यांनी आपला जाणीवपूर्वक अश्लील शब्दांत अपमान केल्याचे राजदीप यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. डॉ. राजदीप यांनी पाठवलेल्या ई-मेलवर तीव्र आक्षेप घेत पाटील यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या आवाजाने विभागाच्या आवारातच विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक जमा झाले. यावेळी विभागप्रमुख रानडे यांनीदेखील दैवता पाटील यांना साथ देत अपशब्द वापरून राजदीप यांचा अपमान केला. यावेळी पाटील यांनी राजदीप यांना सार्वजनिक स्थळी आणखी अपमान करू अशी धमकीच दिली. या अपमानाविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

विभागप्रमुख रानडे आणि सहाय्यक प्राध्यापिका पाटील यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे विद्यापीठ त्यांच्यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून असल्याचे माहीत असूनही डॉ. संजय रानडे आणि डॉ. दैवता पाटील यांनी माझा जाणीवपूर्वक अश्लील शब्दांत अपमान केला. सहकारी शिक्षकाचा अपमान करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे संबंधितांना याबद्दल कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती झालीच पाहिजे. डॉ. सुंदर राजदीप, सहाय्यक प्राध्यापक, तक्रारदार