मुंबईतील प्रत्येक स्थानकावर जखमींच्या उपचारासाठी बेडस् हवेत

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतले अपघातांचे रोजचे बळी पाहता येथील प्रत्येक स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्याची गरज आहे. तसेच तेथे जखमींवर तातडीने उपचार करणाऱ्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीसह खाटांचीही व्यवस्था असावी अशी मागणी पार्लेमेंटरी कमिटीने केल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. उपनगरीय लोकलच्या प्रवासात दररोज सरासरी दहा जणांचा हकनाक बळी जात असतो तर तीन हजार प्रवासी दरवर्षी मृत्युमुखी पडत असून तेवढेच जखमी होत असतात. तरीही मुंबई उपनगरातील साधारण ११५ स्थानकांपैकी केवळ २५ रेल्वे स्थानकांवरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहेत. हीच बाब अधोरेखित करत लोकलेखा संसदीय समितीनेही एकूण सर्कच ११५ स्थानकांत वैद्यकीय केंद्र उभारण्याची शिफारस केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मागकलेल्या माहिती अधिकार अर्जात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ही सुविधा २४ तास उपलब्ध असणे आवश्यक असून पुढील सहा महिन्यांत तशा सुविधा पुरवण्यात याव्यात, अशीही सूचना समितीने केली आहे.