परळच्या बैल-घोडा रुग्णालयात घुबडाच्या पिलावर उपचार, वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचला

2

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कावळे, चिमण्या, घार, घुबड आदी पक्षी जखमी होऊन मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अॅण्टॉप हिल येथील दोस्ती एकर्स या सोसायटीत मंगळवारी रात्री तीन महिन्यांचे घुबडाचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळले होते. वन्यजीव संरक्षक भरत जोशी यांनी तत्काळ धाव घेत त्या जखमी पिलाला परळ येथील बैल-घोडा पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करून उपचार केले. त्यामुळे घुबडाच्या त्या पिलाचा जीव वाचला आहे.

अॅण्टॉप हिल येथील दोस्ती एकर्स या सोसायटीत घुबडाचे पिल्लू जखमी असल्याची माहिती सुहास सावंत आणि खानविलकर या रहिवाशांनी भरत जोशी यांनी दिली. त्यामुळे त्याचा जीव वाचवायाचाच असा निर्धार करून जोशी यांनी धाव घेत जखमी पिलाला परळच्या बैल-घोडा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने शेवटच्या घटका मोजत असलेल्या या पिलाला वेळेत योग्य उपचार मिळल्याने त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यामुळे आपल्या परिसरात साप, माकड किंवा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांना न मारता आपल्याला ९२२१५८०८८८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वन्यजीव संरक्षक भरत जोशी यांनी केले आहे. त्यामुळे सदर पक्षी किंवा प्राण्याचा जीव वाचू शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या