महिला सबलीकरणाचा हीरक महोत्सव!

>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘कर्रम् कुर्रम् कुर्रम् कर्रम्’ हा मंत्र जपत `लिज्जत’ पापडने एकोणसाठ वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. ७ महिलांनी सुरू केलेला पापड उद्योग ४५,००० महिलांच्या रोजगाराचे साधन बनला आहे. `महिला दिन’ आणि `लिज्जतचे हिरक महोत्सवातील पदार्पण’ ह्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून देणाऱ्या `लिज्जत’ गृहोद्योगाचा आढावा…

गेल्या सहा दशकांत भारतीयांनी उडदाचा पापड खाल्ला, तो केवळ `लिज्जत’चा! ह्या विधानात अजिबात अतिशयोक्ती नाही. `लिज्जत’ने भारतीय थाळीची `लज्जत’ वाढवली आणि सुमारे ४५,००० महिलांना ताठ मानेने जगण्यासाठी `इज्जत’ कमावून दिली. सात गृहिणींनी ८० रुपयांपासून सुरू केलेला पापड उद्योग आज १२०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. येत्या १५ मार्च रोजी, `लिज्जत’ गृहद्योग हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि तो उत्सव `याचि देही’ बघण्याचे भाग्य `त्या’ सात महिलांपैकी केवळ ८० वर्षांच्या जसवंतीबेन पोपट ह्यांना लाभले आहे.

lijjat_pic_3

उजामबेन कुंडालिया , लागुबेन गोकानी, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, बानुबेन तन्ना आणि जसवंतीबेन पोपट ह्या गिरगावात लोहाणा निवास येथे राहणाऱ्या मध्यमवर्गीय गुजराती महिलांनी पापड उद्योगाला सुरुवात केली. दुपारच्या फावल्या वेळेत पोटापाण्यासाठी काहीतरी उद्योग सुरू करावा, असे त्यांनी ठरवले. हा उद्योग आपल्या अंगभूत कौशल्यावर आधारित असावा याबाबत त्यांचे एकमत झाले. आपल्या पाकसिद्धीतून टिकाऊ पदार्थाची निर्मिती करायची, असे ठरले. काय बनवायचे? तर `पापड!’

व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज होती. त्यांनी गिरगांवमधील एका सामाजिक कार्यकर्ता छगनलाल करमसी पारेख ह्यांची मदत घेतली. त्यांनी महिलांना ८० रुपये दिले. लक्ष्मीभाईदास या उद्योजकाचा बंद पडलेला पापड व्यवसाय त्या महिलांनी आपल्याकडे घेतला. व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. इमारतीच्या गच्चीवर पापडांच्या ४ पाकिटांनी पापड उद्योगाची सुरुवात झाली. लोकांचा प्रतिसाद पाहता, त्यांनी भुलेश्वर येथील व्यापाऱ्याला पापड पुरवण्यास सुरुवात केली. व्यवसायात कितीही तोटा झाला, तरी कोणाकडूनही देणगी घ्यायची नाही, हे ब्रीद त्यांनी पाळले. (ते आजही पाळले जात आहे. लिज्जत संस्थेकडून देणग्या दिल्या जातात, स्वीकारल्या जात नाहीत.)

सुरुवातीला कोणत्याही वयोगटाच्या मुली यामध्ये सामील होऊ शकत असत. मात्र नंतर १८ वर्षे वयोगटावरीलच मुलींना सामील करून घेतले जाऊ लागले. ३ महिन्यांतच महिलांची संख्या २५ वर गेली. पापड उद्योगाचा उपक्रम संस्थेप्रमाणे आकार घेऊ लागला. स्वाभाविकच त्याचे नामकरण करण्याची गरज निर्माण झाली. घरातील प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीसमान असल्यामुळे `श्री महिला गृहउद्योग’ असे १९६२ साली नामकरण करण्यात आले. मग `लिज्जत’ हे नाव कसे आले? तर त्याचीही रंजक कथा आहे. उद्योगाचे `ब्रँडनेम’ सुचवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्याकरिता ५ रुपयांचे बक्षीसदेखील ठेवण्यात आले होते. धीरजबेन रुपारेल यांनी ‘लिज्जत’ हे नाव सुचविले होते. गुजरातीत `लिज्जत’ ह्या शब्दाचा अर्थ `चविष्ट!’ सर्वांनी एकमुखाने ह्या नामाला पसंती दिली आणि `श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव सर्वतोमुखी गेले. ह्या गृहउद्योगाला भरघोस प्रतिसाद मिळू लागला. १९६२-६३ ला संस्थेने १ लाख ८२ हजार रुपयांच्या पापडांची विक्री केली. शेकडो हात संस्थेला जोडले गेले आणि पाहता पाहता शेकडोचे रूपांतर हजारो हातांमध्ये झाले, तर उत्पन्नात लाखाचे रूपांतर कोटींमध्ये झाले.

छगनलाल पारेख यांच्या विनंतीवरून खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष यू. एन. देवधर यांनी संस्थेला भेट दिली. संस्थेच्या कार्याने देवधर भारावून गेले. `खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाची नोंदणीकृत संस्था’, अशी नवी ओळख त्यांनी श्री महिला गृहउद्योगाला दिली. तसेच ८ लाख रुपयांचे खेळते भांडवलही मिळवून दिले. लिज्जत पापडासोबतच १९७४ साली खाखरा, १९७६ साली मसाला, १९७९ साली गव्हाचे पीठ, बेकरीचे उत्पादने सुरू केली. ७० च्या दशकात माचीस, अगरबत्ती आदी उत्पादने, पण बाजारात आणली होती. मात्र ही उत्पादने तोट्यात गेल्याने बंद करावी लागली. १९८८ साली संस्था साबण उत्पादनात उतरली आणि ‘ससा साबण’ बाजारात आला. त्या वेळी ससा साबणाची वार्षिक विक्री ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. ‘ससा’मुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सबल झाली.

aaeaaqaaaaaaaafyaaaajdvmmdg

`आपण सुरू केलेला उद्योग, ही कोणा एकाची मालमत्ता नाही, तर ह्या पापड उद्योगाशी संलग्न असणाऱ्या महिलांचा ह्यावर समान अधिकार असेल’, असे ह्या सात जणींनी सुरुवातीलाच ठरवून टाकले. त्यामुळे आजतागायत संस्थेवर कोणाही एकाचा मालकी हक्क नाही, तर इथे काम करणाऱ्या महिला संस्थेच्या कर्मचारी आणि मालक आहेत. फायदा झाला तरी सगळ्यांचा आणि तोटा झाला, तरी सगळ्यांचा, हे व्यावसायिक गणित तिथे काम करणाऱ्या प्रत्येकीच्या अंगवळणी पडले आहे. म्हणूनच की काय, इथे कामाचा रतीब कोणी टाकत नाहीत, तर आपल्या कामाचा वाटा निवडून स्वखुशीने कामाचे टार्गेट पूर्ण करतात.

स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी चालवलेला आणि केवळ महिलाच भागीदार असलेला जगातील हा एकमेव गृहद्योग आहे. इथे बायका आपल्या वेळेनुसार कार्यालयात येतात, वजनावर मळलेले पीठ घेतात, तयार केलेले पापड जमा करतात आणि रोजंदारी घेतात. इथे काम करणाऱ्या महिला दिवसाला ५०० ते ६०० रुपये कमावतात. ह्याचाच अर्थ, त्या घर सांभाळून, कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून, रिकामा वेळ सत्कारणी लावून नोकरदार महिलांइतकी कमाई करत आहेत.
ह्या संस्थेत कामाची सुरुवात केलेल्या अनेक महिला संस्थेच्या मोठ्या पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. जसे की, प्रतिभा सावंत! ह्यांनी २५ वर्षांपूर्वी लिज्जत समूहाबरोबर घरी बसून पापड लाटण्याच्या कामाला सुरुवात केली. एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे त्या पुढच्या पिढीतल्या महिलांच्या मार्गदर्शक बनल्या आहेत.

ठराविक वेळेत कामाचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रोत्साहनपर ५ ग्रॅम किंवा १० ग्रॅमचे सोन्याचे नाणे दिले जाते. आजवर अनेक महिलांनी ते मिळवले आहे. आयुष्यभर इमानदारीने काम केलेल्या महिलेला `लिज्जत’ पापडने किमान पाव किलो सोने निश्चितच मिळवून दिले आहे.

महिला घरी नेऊन काम करत असल्या, तरी त्यांनी बनवलेल्या पापडांची गुणवत्ता, स्वच्छता तपासून मगच त्यांना कामाचा मोबदला दिला जातो. त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला निरीक्षक नियुक्त केलेल्या आहेत. त्या कोणतीही पूर्वसूचना न देता, सदर महिलेच्या घरी जाऊन तिचे काम तपासतात. अशा छोट्या, परंतु महत्त्वपूर्ण बारकाव्यांकडे लक्ष दिल्यामुळे लिज्जत पापडची गुणवत्ता आणि त्याचे स्थान टिकून आहे. मुंबईसह संपूर्ण देशात या संस्थेच्या ८२ शाखा आणि २७ विभाग कार्यालये आहेत.

या उद्योगाने असंख्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. लाखो महिला आज स्वयंपूर्ण आहेत. पैकी सुमारे ४५ हजार महिला सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य महिला, सहमालक असल्याने कंपनीचा नफा प्रत्येकीला समान आणि वाढीव वणाईच्या स्वरूपात दिला जातो. आज कंपनीची उलाढाल १२७१ कोटी रुपये असून ४४ कोटी रुपयांची परदेशी निर्यात आहे. हा आकडा अर्थातच वाढत जाणार आहे.

`लिज्जत’ समूह भारतापुरता मर्यादित राहिला नसून, तो जगभरात पोहोचला आहे. `लिज्जत’ समूहाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ह्या उद्योगात काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या रंग, रूप, जातपात, वय, भाषा ह्यावरून पारखले जात नाही, तर कामावरून पारखले जाते. ही समानता निर्माण केल्याबद्दल २००५ मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते `बेस्ट इक्वॅलिटी अवॉर्ड’ देण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी महिला दिनाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते `महिला विकास अवॉर्ड’ देऊन `लिज्जत’ समूहाचा सन्मान करण्यात आला.

एवढ्या यशस्वी वाटचालीनंतर, अब्जावधी रुपये कमावल्यानंतर माणसांच्या जागी यंत्रांचा वापर करून लिज्जतला `डिजिटल क्रांती’ करता आली असती. मात्र, पैसा कमावणे, हा ह्या उद्योगनिर्मितीचा उद्देश नसल्यामुळे तिथे महिला विकासाला, सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले. हेतू स्वच्छ असल्यामुळे कामातही पारदर्शकता आली आणि उपक्रमाशी लाखो महिला जोडल्या गेल्या. ह्या विस्तारलेल्या वटवृक्षाकडे पाहताना जसवंतीबेन पोपट ह्यांना खऱ्या अर्थाने दररोज `महिला दिन’ साजरा होत असल्याचे जाणवत असेल, ह्यात शंका नाही!