डिजिटल मीडिया म्हणजे पार्ट टाईम शेतीच! सांगताहेत ट्रम्प तात्या

36
विश्वनाथ घाणेगावकर


vishal-dp-photo>> विशाल अहिरराव
सध्या डिजिटल व्यवसायात उडी घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मराठीमध्येही डिजिटलचे वारे जोरदार वाहत आहेत. मात्र मराठीत ज्यांनी हे वारे सुरू केलं त्यामधला एक आहे तो ट्रम्प तात्या. म्हणजे ट्रम्पला मराठी आवाज देणारा विश्वनाथ घाणेगावकर. डिजिटल मीडियात काम करताना मजा येते, पण इथं सातत्य पाहिजे. कारण इथं शेती इतकीच अनिश्चितता आहे. मराठी डिजिटल मीडियातील ही मुलं एकप्रकारची ट्रेंड सेटर आहेत त्यामुळेच त्यांच्याकडून जाणून घेतलं कसं आहे हे डिजिटल मार्केट.
बाहुबली-२ प्रदर्शित झाला आणि त्याची खूप चर्चा सुरू होती. त्याचवेळी विश्वनाथ घाणेगावकर आणि त्याचा मित्र याला विचार डोक्यात आला की, बाहुबलीबद्दल ट्रम्प मराठीत बोलले तर कसे बोलतील असा विचार करून त्यांनी डब्बिंग करून खासरेटीव्ही यूट्युब चॅनलवर अपलोड केला. त्याला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. दोन दिवसातच लाखों हिट्स मिळाल्यानंतर त्यांनी त्यावर अधिक काम करायचं ठरवलं. लोकही ट्रम्प यांचे असे आणखी व्हिडीओ मागत होते. मग काय सहा महिने त्यांच्या संपूर्ण टीमने धम्माल उडवून दिली. सहा महिन्यांत ५० हजार सबस्क्रायबर मिळवले. हा मराठीतला रेकॉर्डच म्हणायला पाहिजे. त्यानंतर मात्र विश्वनाथ काही वैयक्तिक कारणामुळे खासरेटीव्हीसोबत काम करू शकला नाही. तसंच ट्रम्प-ट्रम्प देखील खूप झालं होतं. त्यामुळे थोडा काही वेगळा विचार करायचा असं ठरलं. यानंतर विश्वनाथ आपल्या अडचणीत अडकला होता. पण त्यातून बाहेर आल्यानंतर त्यानं नवीन युट्युब पेज सुरू केलं. अँटिक नाव दिलं की पेजवर लोक येतात, हे त्याला कळालं होतं. त्यामुळे त्यानं ‘झंड जिंदगी’ नाव दिलं. तर अक्की बर्वे या मित्रासोबत ‘लैभारी’ नावाचं पेज बनवलं. ज्याला ४ लाखाच्यावर फॉलोअर्स आहेत.
अक्की बर्वे
अक्की बर्वे

विश्वनाथ म्हणतो की डिजिटलमध्ये करण्यासारखं भरपूर आहे. मात्र तुम्ही त्यासाठी योग्य वेळ दिला पाहिजे. इथे प्रचंड अनिश्चितता आहे. एखादं युट्युब चॅनेल तुम्हाला सुरू करायचं असेल तर प्रथम तीन दिवसाला एक असा व्हिडीओ तुम्ही अपलोड करा. यामध्ये सातत्य असू द्या. कधी तुम्हाला १० हजार व्ह्यूज मिळतील तर कधी हजार-बाराशे मिळतील. पण धीर सोडू नका. तुम्ही जेवढा अधिक वेळ द्यायला शिकालं तेवढं तुम्हाला लोक काय पाहातात, त्यांची आवड काय आहे ते कळेल.

तुम्हाला व्हिडीओ अपलोड करायचा असेल तर आधी सर्फिंग करा, तुम्ही खूप सारे व्हिडीओ पाहा. मग तुम्हाला काय अपलोड करायचं ते कळेल. त्यामुळे जास्त बघा आणि थोडं अपलोड करा. पण जबरदस्त कटेंट असेल तेच अपलोड करा. तुमचा व्हिडीओ चालला नाही असं झालं तर तुमचा कंटेट मार खातो हे समजा, असं तो म्हणतो.
जो विषय तुम्ही तुमच्या पेजसाठी, किंवा चॅनेलसाठी म्हणून निवडला असेल तर त्यावर कायम राहा. नाही तर सबस्क्राईबर खूप असले तरी व्ह्यूज अपेक्षित मिळत नाही. तो या सबुरी हा गुण प्रत्येक क्षेत्राप्रमाणे इथेही लागू होतो. एखादे वेळी तुम्हाला पटकन यश मिळेल पण ते टिकवणं अधिक कठीण असतं म्हणून सातत्यावर तो जोर देतो. तसेच ग्रामीण भाषेतला लहेजा, मुलांमध्ये चालणारे विषय यावर फोकस केलं तर त्याचा फायदा नक्की होईल, असं तो म्हणतो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक गणित. पैशाचं सोंग करता येत नाही, हे ध्यानात ठेवावं, असं त्याचं म्हणणं आहे. कारण युट्युब, फेसबुकवरून मिळणारा पैसा त्यातुलनेत कमी असतो. कारण त्यांचे नियम, अटी खूप आहेत. परत आपल्या अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर पैसे कमी मिळतात. जिओ मार्केटमध्ये आल्यानंतर व्हिडीओ कटेंट आणि डिजिटल मार्केट झपाट्यानं वाढलं. पण तितकेच स्पर्धक वाढले आहेत. आता ट्रम्पचंच उदाहरण घेतलं तर मराठीत व्हिडीओ बनवणारे ही खूप वाढले आहेत. असेच प्रत्येकाचे आहे. त्यामुळे त्याला पार्ट टाईम द्या. त्यामुळे डिजिटल मीडिया म्हणजे पार्ट टाईम शेतीच! असंच त्याचं म्हणणं आहे. तो स्वत: थ्रीडी अॅनिमेशन करून बिल्डिंग प्लॅनची कामं करतो आणि मग उरलेला वेळ डिजिटल मीडियाला देतो.  एका ठिकाणाहून १०० रुपये येण्यापेक्षा १०० ठिकाणांहून एक रुपया येणं अधिक चांगलं. कारण त्यातले १० बंद पडले तरी ९० हातात येतात. कदाचित त्याचा हाच विचार त्याला अधिक उंचीवर नेईल. तेव्हा विश्वनाथ आणि त्याच्या टीमला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
आपली प्रतिक्रिया द्या