सार्वजनिक बँकांचा तोटा


>>अनंत बोरसे<<

१९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर देशाच्या आजवर झालेल्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी या बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही आर्थिक विकासाची नस म्हणून बँकिंग क्षेत्राकडेच पाहिले जाते आणि त्याच हेतूने स्व. इंदिराजींनी राष्ट्रीयीकरणाचा घाडसी निर्णय घेतला. परंतु आता अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे नफा-तोटय़ाची तसेच थकीत आणि बुडीत कर्जाच्या रकमांची आकडेवारी बघून सामान्य माणूस चिंतातूर झाला आहे. विद्यमान सरकारने मोठा गाजावाजा करून ‘मुद्रा’ योजनेत कर्ज द्यायला बँकांना भाग पाडले आणि आता त्या योजनेतील कर्जही मोठय़ा प्रमाणात थकीत झाल्याचे समोर येत आहे. त्यात मल्ल्या किंवा नीरव मोदी, चोक्सी यांच्यासारख्या ठगांनी बँकांना करोडो रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पलायन केले आहे, त्याचा मोठा फटका बड्या बँकांना बसला आहे. आता तर देशातील सर्वात मोठी समजली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदासारख्या इतर मोठय़ा सार्वजनिक बँका किंवा खासगी बँका या तोटा नोंदविताना दिसत आहेत. देशातील एकूण २१ सार्वजनिक बँकांपैकी केवळ दोनच बँकांनी नफा नोंदविला आहे तर इतर सर्व म्हणजे १९ बँकांचा तोटा जवळपास ८७ हजार कोटी रुपये ऐवढा आहे. थकीत आणि बुडीत कर्जेही जवळपास ९ लाख कोटींच्या घरात पोहोचत आहेत. काँग्रेस काय किंवा आताच्या सरकारच्या काळात काय, बँकांवर नेहमीच सरकारचा दबाव आणि हस्तक्षेप असतो. काँग्रेसच्या काळातही कर्जमाफी आणि कर्ज वाटपातील सरकारचा हस्तक्षेप असायचाच, कर्ज मेळावे भरवले जायचे. या सर्वात सार्वजनिक बँकांचे हित जपले गेले नाही. याउलट सार्वजनिक आणि सहकारी बँका म्हणजे बडय़ांसाठी एक ‘चराऊ कुरणेच’ ठरल्या आहेत. म्हणून तर दिवसेंदिवस बँकांचे कर्ज बुडविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शेवटी या बँकांचा तोटा सरकार जनतेच्या पैशांतूनच भरून काढणार. सामान्य जनता एक भविष्यातील तरतूद म्हणून आपली पुंजी बँकांमध्ये मोठय़ा विश्वासाने सुरक्षित राहील म्हणून ठेवते, पण बँकांच्या अशा स्थितीत सर्वसामान्य जनता, बँकिंग व्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवायला तयार होईल? एकूणच देशातील बँकांची स्थिती चिंताजनकच म्हणावी लागेल. बँका तोटय़ात, उद्योगधंदे तोटय़ात, शेती-व्यवसाय तोटय़ात, हे काय चाललंय? मग फायदा कोणाचा होत आहे? बँकांची ही आजची दशा नक्कीच चिंतेची बाब आहे. सरकारला बँकिंग क्षेत्राला नक्की कुठल्या दिशेने न्यायचे आहे हे, ठरवायला हवे.