सिद्धगड संग्राम : एक थरारक अनुभव

>>अनंत श्रीराम गवळी<<

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेक क्रांतिकारकांनी हसत हसत बलिदान दिले. अनेकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुरबाड तालुक्यातील आझाद दस्ताचे वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी देशासाठी पत्करलेल्या वीरमरणाला आज म्हणजे २ जानेवारीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या संपूर्ण लढय़ाला एक संक्षिप्त उजाळा….

सिद्धगड! ठाणे जिह्यातील मुरबाड तालुक्यातील हे एक धारातीर्थ क्षेत्र. आझाद दस्त्यातील स्वातंत्र्यवीरांना अंगाखांद्यावर घेतानाच भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या रक्ताच्या अभिषेकाने न्हाऊन गेलेले. आझाद दस्ता  या नावाने ओळखणारी ही क्रांतिकारकांची टीम भाई ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल-माथेरान-नेरळ यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असे. सरकारी नोकरी व सुखवस्तू कुटुंबातील जीवन सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. त्यावेळी त्यांचे प्रमुख सहकारी होते मानवली-नेरळ वास्तव्य असलेले ६० वर्षीय तरुण गोमाजी हिराजी पाटील ऊर्फ काका. हुतात्मा हिराजी पाटील यांचे पिताश्री. स्वातंत्र्यलढय़ात पिता-पुत्र जोडी अभावानेच आढळतील. वास्तविक हिराजींचा स्वातंत्र्यलढय़ात थेट असा संबंध नव्हताच. आझाद दस्त्यातील स्वातंत्र्यवीर जेव्हा नेरळ परिसरातील मुक्कामी असत तेव्हा त्यांना शिधासामुग्री पुरविणे, इकडच्या तिकडच्या खबरबात देणेघेणे हे काम ते करीत. मुक्काम जसजसा दूर जाई तसतसा संपर्क तुटत जाई. पण काका ऊर्फ गोमाजी पाटील यांचा ठावठिकाणा कुठे आहे यासाठी पोलीस अत्याचार व मारहाणीचा मार्ग अवलंबून असत. एकदा पोलिसांनी हिरोजींना पकडून नेरळहून कल्याण येथे नेत असताना पलायन केले व थेट वडिलांना भेटायला सिद्धगड मुक्कामी गेले. यापुढे पोलिसांचा मार खाण्यापेक्षा स्वातंत्र्यलढय़ासाठीच काम करू असे जाहीर केले.

गोमाजीकाका पाटील हे दस्त्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ. भाई कोतवालसहित सर्वांनाच ते आदरणीय होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी सतत ७० कि.मी. चालण्याचा विक्रम केला होता. ते काका दस्त्यातील उत्तम आचारीही होते. एकदा एका जंगलातील मुक्कामात जेवणाची सामुग्री उपलब्ध नव्हती. तेव्हा जंगलातील आदिवासींनी दिलेल्या रताळय़ाचे चविष्ट वडे बनवून दस्त्यातील सहकाऱ्यांच्या जिभेवर त्याची चव दीर्घकाळ रेंगाळत ठेवली होती. पोलिसांच्या माराने पायाला आलेले व्यंग त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ करून होते. भाई कोतवाल हे लढय़ातील पुढील कार्यक्रम, आखणी, मुक्काम तसेच  दस्त्यातील नवीन भरती इत्यादी सर्व काकांच्या सल्ल्यानेच करीत.

आझाद दस्त्याचे प्रमुख काम, इंग्रज सरकाराच्या कामकाजात अडथळे आणून त्यांना जेरीस आणणे हे होते. त्यासाठी ते प्रामुख्याने मुंबईला विद्युत पुरवठा करणारे चालू पायनल (टॉवर) कापून विद्युत पुरवठा बंद करणे, टेलिफोन तारा तोडणे, रेल्वे सामुग्री उखडणे, पोलीस चौकींना आग लावणे, गाफील पोलिसांवर थेट हल्ला करून त्यांच्या बंदुकी पळविणे अशा प्रकारची कामे करीत. मुंबई-कल्याण-पाली, माथेरान-मुरबाड-अमरावती-रामकोट-व उत्तर कर्नाटक अशा ठिकाणचे सुमारे ५० जण थेट तर तितकेच अप्रत्यक्ष क्रांतिकारक आझाद दस्त्यात काम करीत होते. एका मुक्कामी ते सहसा ३-४ दिवसांपेक्षा जास्त राहत नसत. दुर्दैवाने सिद्धगडावरील मुक्काम ७-८ दिवस पडला व तेथेच घात झाला.

ज्या दिवशी गोळीबार (२ जानेवारी १९४३) झाला त्याच्या आदल्याच दिवशी रात्री सर्वजण भीमाशंकरकडे कूच करणार होते. पण काळाच्या उदरात दुर्दैव लपले होते. बॅटरीचे सेल संपले होते व कंदिलाचे रॉकेलही नव्हते. नेरळ व माथेरान येथून खबरबात काढणारी माणसेही येणार होती. भाईंच्या सांगण्यावरून भगत मास्तरांनी मारुती पाटील यांच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी ‘लाल्या वाझे’ या आदिवासींकडे दिली होती. दुर्दैवाने ती चिठ्ठी मारुती पाटलांच्या ऐवजी गोविंद साबळे यांच्या हाती लागली. साबळे यांना दस्त्यातील स्वातंत्र्यवीरांवर पोलिसांनी लावलेली हजारो रुपयांची बक्षिसेही माहीत होती. आता त्यांना स्वातंत्र्यवीरांचा मुक्कामही माहीत झाला. त्यांनी ती चिठ्ठी मुरबाडच्या अण्णा बोकड यांना दिली. त्यांनी थेट ठाण्याचे डीएसपी इंग्रज अधिकारी हॉल यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्वरित मोठा फौजफाटा घेऊन भल्यापहाटे सिद्धगड गाठले.

दस्त्यातील जवान सिद्धगडावर आळीपाळीने पहारा देत होते. पहाटे हिराजींची वेळ होती. पहाटे हिराजी चूळ भरण्यासाठी घळीतील नाल्यात आले आणि खाली मोठय़ा दगडाआड लपलेल्या इंग्रज हॉलच्या बंदूक गोळीने पोटाला आरपार छेद दिला… मेलो! सावधान! बाबा मेलो! ही आर्त किंकाळी पहाटेच्या थंडीत, बंदुकीच्या आवाजाने पक्ष्यांच्या किलबिलाटाबरोबर दऱ्याखोऱ्यात कंप पावत गेली. क्षणार्धात सर्वजण जागे व सावध झाले. भाईंना संकटाची कल्पना आली. पोलीस फौजफाटा मोठा असल्याने त्यांनी सहकाऱ्यांना पळा जा आणि जीव वाचवा असे सांगितले. पहाटेच्या झोपेत अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बंदुकी असूनही प्रतिकार करू शकले नाहीत. सगळीकडे पांगापांग झाली. गोमाजी काकांचे भाचे व एक सैनिक भगत मास्तर यांनी कपारीचा आधार घेत लपून राहिले. त्यांच्या अंगावर झिपरू गवळी, मारुती शेलार, कांतरा शेट्टी असे एकमेकांच्या अंगावर निपचित पडून वरून अंगावर गवत घेऊन लपून राहिले.

हिराजी पडल्यावर तुफानी गोळीबारात घळीतून वर चढताना भाईंच्या मांडीचा वेध एका गोळीने घेतला. भाई तशा अवस्थेत लंगडत पोलिसांना चकवत पुढे चालले होते. सोबत अंबरनाथचे धोंडू देसाई त्यांना आधार देत चालत होते. जसजसे पोलीस जवळ  येऊ लागले तसे भाईंनी देसाईंना पुढे जाण्यास सांगितले. भाईंना एकटे सोडून जाण्यास धोंडू देसाईंच्या जिवावर आले. पण भाईंनी आज्ञा केली. शेवटी नाइलाजाने ते पुढे सटकले. जखमेमुळे भाईंनी एका झाडाचा आधार घेतला. पोलीस मागावर होतेच. त्यांनी भाईंच्या देहाची चाळण केली. काही गोळ्या झाडातही गेल्या. आजही ते पवित्र झाड सिद्धगडाच्या या थराराचा एक साक्षीदार म्हणून उभे आहे. क्रूरकर्मा इंग्रज हॉल भाईच्या देहाजवळ ओळख पटविण्यासाठी आला. त्याने भाईंच्या शरीरात अजूनही धुगधुगी आहे हे पाहून अतिशय निर्दयतेने डोक्यावर बंदूक ठेवून चाप ओढला… क्षणार्धात जाज्ज्वल्य स्वातंत्र्यप्रेम आणि उत्तुंग स्फुल्लिंग असलेल्या त्या थोर स्वातंत्र्यप्रेमीची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. एक धगधगते अग्निकुंड निमाले.

गोमाजी काका रस्ता चुकल्याने नेमके पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. भाई व हिरोजींची  कलेवर उघडय़ावर पडून होती. बराच वेळ चालू असलेली धुमश्चक्री संपली. गडावर आता कुणी नाही याची खातरजमा करून पोलिसांनी हिराजी व  भाईंची पार्थिव दोरीने बांधून फरफट खाली बोरवाडीपर्यंत चालविली होती. इकडे कपारीत लपलेले भगत मास्तर व इतर खालील सर्व थरार पाहत होते. दुसरीकडे एका बाजूलाच रामलालही एका खड्डय़ात पालापाचोळा अंगावर घेऊन लपला होता. त्यावरून पोलीस चालत होते. जरा कुठे सळसळ झाली की त्या दिशेने गोळ्यांचा वर्षाव होत होता. लपलेले सर्वजण २४ तास तसेच पडून होते. अखेर दुसऱ्या दिवशी पोलीस फौजफाटा निघून गेला. त्यानंतर सर्वजण बाहेर आले. हुतात्मादिनी निर्जला एकादशी होती. समोर झरा वाहतोय, पण पाण्याचा एकही थेंब ते ग्रहण करू शकले नाहीत. खऱ्या अर्थाने सर्वाना निर्जला एकादशी घडली. त्यानंतर सर्वजण झिपरू गवळीच्या मामाकडे आश्रयाला गेले, पण अगोदरच कुणीतरी खबर दिल्याने तिसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. भाईंना सोडून नाइलाजाने पुढे निघालेले धोंडू देसाई एका शेतकऱ्याच्या आश्रयाला आले, पण शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांना दोरीने बांधून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले.

अशा रीतीने उरलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अटक झाली आणि अखेर देश स्वतंत्र झाल्यावरच त्यांची सुटका झाली.