माझ्यासाठी मुख्यमंत्रीच देव! ईश्वराऐवजी आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या नावे घेतली शपथ

सामना ऑनलाईन । अमरावती

आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वायएसआर काँग्रेस सत्तेत आली आहे. या पक्षाच्या आमदाराने आमदारकीची शपथ घेताना ईश्वराऐवजी चक्क मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. “माझ्यासाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ईश्वरासमान आहेत” असे आमदार कोटमरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी म्हटले आहे. ते नेल्लोर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

आंध्र प्रदेशात नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देण्यात आली. नेल्लोर ग्रामीणचे आमदार कोटमरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वराच्या नावे शपथ घेण्याऐवजी जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अडवले. नंतर आमदार रेड्डी यांनी ईश्वराच्या नावाने शपथ घेतली. जगनमोहन यांच्या नावे शपथ का घेतली असवं कोटमरेड्डी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की जगनमोहन हे माझ्यासाठी ईश्वरासमान असून भावनेच्या भरात आपण अशी शपथ घेतली. या अगोदर देखील ईश्वराऐवजी एका आमदारांनी एन.टी.रामाराव यांच्या नावाने शपथ घेतली होती असा दावाही कोट्टमरेड्डी यांनी केला आहे. मी हे कुणत्याही पदाच्या लालसेने केले नसल्याचेही कोट्टमरेड्डी यांचे म्हणणे आहे. आपण एका गरीब कुटुंबातून आले असून आपली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. असं असतानाही जगनमोहन रेड्डी यांनी आपल्याला दोन वेळा आमदारकीची संधी दिली यामुळे मी त्यांचा ऋणी आहे असं ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या